Share Market l केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी आज, शनिवारी सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. ३० शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स १३६.४४ अंकांनी वधारून ७७,६३७.०१ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी २०.२ अंकांनी वाढून २३,५२८.६० वर पोहोचला. ३० शेअर्सच्या ब्लू-चिप पॅकमध्ये आयटीसी हॉटेल्स, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसी सर्वाधिक नफ्यात राहिले. टायटन, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, एशियन पेंट्स, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
दीर्घकालीन योजना बजेटनंतर बाजाराची दिशा ठरवतील :
बजेटमधील घोषणांचा परिणाम बाजारावर होत राहील. मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी आणि उपभोगाला चालना देण्यासाठी वैयक्तिक आयकरात कपात करण्याची मोठी अपेक्षा बजेटकडून आहे. यामुळे विकासाला चालना मिळेल. अर्थमंत्री कर सवलतीबाबत काय निर्णय घेतात हे लवकरच कळेल. पण, तूर्तास तरी मोठ्या सवलतीची अपेक्षा नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले, “बाजार विकासाला चालना देणाऱ्या उपायांच्या शोधात असेल, भांडवली नफा करातील बदलांसारख्या सवलतींच्या नाही.” ते पुढे म्हणाले की, बजेटवरील बाजाराची प्रतिक्रिया काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. विकास आणि उत्पन्नातील सुधारणेचे कल मध्यम ते दीर्घ मुदतीत बाजाराची दिशा ठरवतील.
Share Market l आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात? :
सरकारच्या बजेटपूर्व आर्थिक सर्वेक्षणानुसार, आगामी आर्थिक वर्षात भारताचा अर्थविकास दर ६.३-६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो विकसित देश होण्यासाठी आवश्यक विकास दरापेक्षा खूपच कमी आहे. विकासाला चालना देण्यासाठी जमीन आणि कामगार क्षेत्रातील नियम शिथिल करणे आणि इतर सुधारणांची गरज आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीसंबंधीच्या दस्तऐवजात असे संकेत देण्यात आले आहेत की, भारताचा जगाला मागे टाकणारा विकास मंदावत आहे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असलेला ८ टक्के वार्षिक दर गाठण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. शनिवार सुट्टी असल्याने आशियाई बाजार बंद राहतील. यापूर्वी, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली.
मागील वर्षांमध्ये बजेटचा बाजारावर काय परिणाम झाला? :
बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांपासून बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची दिशा बदलते. जर बाजारात घसरण झाली तर काही काळाने त्यात सुधारणाही होते. असे असले तरी मागील पाच वर्षांतील बजेट पाहिल्यास, दोन वेळा बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली आणि तीन वेळा बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
यावेळी बजेटचा बाजारावर कसा परिणाम होईल, हे सांगणे कठीण आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात नफावसुली दिसून आली. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी निफ्टी आणि बीएसई निर्देशांकात वाढ झाली. बुधवार, २९ फेब्रुवारी रोजी एनएसई निफ्टी २०५.८५ अंकांनी आणि बीएसई ६५३.९५ अंकांनी वाढून बंद झाला. बजेट सप्ताह असल्याने बाजारात अस्थिरता कायम आहे. जर मागील पाच वर्षांच्या बजेटकडे पाहिले तर, बजेट भाषणादरम्यान बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.








