Railway Recruitment 2026 | देशातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Indian Railways अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी हजारो पदे उपलब्ध आहेत. या भरतीमुळे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना रेल्वे सेवेत प्रवेश मिळण्याची संधी मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेची घोषणा Railway Recruitment Board (RRB) कडून करण्यात आली आहे. या अंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ असिस्टंट लोको पायलट (ALP) पदे भरण्यात येणार आहेत. १६ मार्च २०२६ रोजी या भरतीची संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून सविस्तर माहिती मे महिन्यात जाहीर होणार आहे.
पदांची माहिती आणि पगार किती? :
या भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी देशभरातील विविध आरआरबीमार्फत नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सविस्तर अधिसूचना १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२६ ठेवण्यात आली आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला लेव्हल-२ अंतर्गत ₹१९,९०० इतके मूलभूत वेतन मिळणार आहे. यासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) तसेच इतर विविध सरकारी भत्ते दिले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारा एकूण पगार यापेक्षा अधिक असतो. याशिवाय सरकारी सेवेमधील पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभही उपलब्ध होतात.
Railway Recruitment 2026 | पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी (मॅट्रिक/एसएसएलसी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत फिटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर व्हेईकल मेकॅनिक, वायरमन, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक अशा विविध ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI केलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची गणना १ जुलै २०२६ या तारखेच्या आधारे केली जाणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. (RRB ALP Recruitment)
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरून फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्क सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹५०० ठेवण्यात आले असून इतर प्रवर्गांसाठी नियमांनुसार सवलत लागू आहे.
निवड प्रक्रिया सीबीटी-१, सीबीटी-२, संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून पार पडणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक मोठी संधी मानली जात आहे.






