Luxury Cars | भारत आणि युनायटेड किंगडम (United Kingdom) यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे देशातील लक्झरी कार बाजारात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 15 जुलैपासून लागू झालेल्या या करारानंतर ब्रिटनमधून आयात होणाऱ्या अनेक प्रसिद्ध कार ब्रँड्सवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता असून ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.
आयात शुल्कात मोठी कपात, या ब्रँड्सच्या कार स्वस्त होणार :
आतापर्यंत ब्रिटनमध्ये तयार होऊन भारतात आयात केल्या जाणाऱ्या पूर्ण तयार लक्झरी कारवर 110 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. मात्र भारत-यूके मुक्त व्यापार करार (India-UK Free Trade Agreement) लागू झाल्यानंतर हे शुल्क थेट 30 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. पहिल्या वर्षात ही सवलत 20 हजार आयात होणाऱ्या कारच्या निश्चित कोट्यापुरती लागू राहणार आहे.
या निर्णयाचा थेट लाभ रोल्स-रॉयस (Rolls-Royce), लँड रोव्हर (Land Rover), जग्वार (Jaguar), ॲस्टन मार्टिन (Aston Martin), मॅकलारेन (McLaren) आणि बेंटले (Bentley) या ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड्सना मिळणार आहे. याशिवाय यूकेमधून आयात होणाऱ्या ऑटो पार्ट्सवरील शुल्कातही कपात करण्यात आली असल्याने भविष्यात या वाहनांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्चही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Luxury Cars | कारच्या किमतीत कोट्यवधींची घट, भारतीय उद्योगालाही फायदा :
आयात शुल्कात 80 टक्क्यांची कपात झाल्यामुळे लक्झरी कारच्या अंतिम शोरूम किमतीत मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या वाहनांच्या किमती 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. परिणामी 7 ते 8 कोटी रुपयांच्या कारच्या किमतीत तब्बल 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सुमारे 5 कोटी रुपयांच्या वाहनांवर 1 ते 2 कोटी रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
या करारामध्ये भारतीय वाहन उत्पादकांच्या हिताचाही विचार करण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांना आयात शुल्कातील सवलत तातडीने लागू झाली असली तरी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी वेगळे नियम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील स्थानिक ईव्ही उत्पादकांना पुढील पाच वर्षे संरक्षण मिळणार आहे. तसेच भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांना ड्युटी-फ्री प्रवेश मिळणार असल्याने निर्यात वाढीसही चालना मिळेल. याशिवाय यूकेमधून आयात होणाऱ्या कमर्शियल ट्रक्सवरील शुल्कही सध्याच्या 44 टक्क्यांवरून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने 8.8 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार असून, लवकरच कंपन्या सुधारित किमती जाहीर करण्याची तयारी करत आहेत.






