Amol Mitkari Angry | राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनातील सुरक्षारक्षकांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारण, त्यांच्या स्वीय सहाय्यकाला (PA) विधानभवनाच्या गेटवर अडवलं गेलं. यामुळे संतप्त झालेल्या मिटकरी यांनी “मी सत्ताधारी आमदार आहे, पण मलाही भावना आहेत,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. (Amol Mitkari Angry)
गुरुवारी पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर विधानभवन परिसरात सुरक्षेची नवी नियमावली लागू करण्यात आली होती. यामध्ये अभ्यागत आणि यलो पासधारकांना प्रवेश नाकारण्यात आला, तर ग्रीन पासधारकांनाही केवळ सरकारी अधिकारी असल्यासच प्रवेश दिला गेला. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांच्या पीएला गेटवर रोखलं गेलं.
“सुरक्षेचं शहाणपण उशिरा सुचलं का?” :
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले, “काल दिवसभर मकोका आरोपी आणि तडीपार गुंड मोकाट फिरत होते आणि आज आमच्याकडे पास असूनही आम्हाला अडवलं जातंय. हे शहाणपण आज शेवटच्या दिवशीच का सुचलं?” (Amol Mitkari Angry)
ते पुढे म्हणाले, “सकाळी १० वाजल्यापासून विधान परिषदेचं कामकाज आहे. मी सभापतींना संपर्क साधायचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. माझा केअर टेकर रोज माझ्यासोबत असतो. आज मात्र त्याला मुद्दाम थांबवून ठेवण्यात आलं आहे. ही अपमानास्पद वागणूक आहे.”
Amol Mitkari Angry | “मी इथेच ठिय्या आंदोलन करणार” :
अमोल मिटकरी यांनी थेट इशारा देत सांगितले, “जोपर्यंत माझ्या पीएला प्रवेश दिला जाणार नाही, तोपर्यंत मी गेटवरून हलणार नाही. मी इथेच ठिय्या आंदोलन करणार आहे. सत्ताधारी आमदार असूनही माझ्या माणसांना अडवणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”
मिटकरी यांचा आरोप आहे की, “आम्ही काय दहा गुंड घेऊन चाललो होतो का? हे पोलीस कायद्याची अंमलबजावणी करतायत की खाजगी आकसाने वागतायत? जर काल मकोका आरोपी मोकाट सोडले जात असतील आणि त्यांना रोखलं जात नसेल, तर आज आमच्या स्वीय सहाय्यकाला अडवणं म्हणजे दुहेरी धोरण नव्हे का?”
सुरक्षेची गरज, पण नियम सर्वांसाठी समान हवेत :
विधानभवनातील राड्यानंतर सुरक्षेचे नियम कडक करणे आवश्यक होते हे मान्य असले तरी, सत्ताधारी आमदारांच्या अधिकृत सहाय्यकांना अडवणे आणि अपमानास्पद वागणूक देणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. मिटकरी यांचे म्हणणे आहे की, “सरकार आमचं असलं तरी आम्ही बाहेरचे नाही, आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत.”






