ICC T20 World Cup 2026 | आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी क्रिकेट चाहत्यांना तिहेरी मेजवानी मिळणार आहे. एकूण तीन सामने खेळवले जाणार असून यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नामिबिया विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर टॉस 6:30 वाजता होणार आहे. सलग दुसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारत मैदानात उतरणार आहे.
श्रीलंका विरुद्ध ओमान सामना पार पडला:
आज सकाळचा पहिला सामना बी गटातील श्रीलंका आणि ओमान यांच्यात झाला आहे. हा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे सकाळी 11 वाजता खेळवला गेला. श्रीलंकेने आयर्लंडवर मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे, तर ओमानला झिंबाब्वेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. (ICC T20 World Cup 2026)
दिवसातील दुसरा सामना सी गटात नेपाळ आणि इटली यांच्यात रंगणार आहे. इटलीची वर्ल्ड कपमध्ये ही पहिलीच उपस्थिती आहे. त्यांच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने त्यांना पराभूत केले. दुसरीकडे, नेपाळने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध केवळ 4 धावांनी सामना गमावला आणि आपल्या लढाऊ वृत्तीची झलक दाखवली.
नेपाळसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विजय मिळवला तर सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत राहतील. तसेच गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकण्याचीही संधी निर्माण होऊ शकते. सध्या सी गटात वेस्ट इंडिज अव्वल, स्कॉटलंड दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे नेपाळ विरुद्ध इटली लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ICC T20 World Cup 2026 | भारत विरुद्ध नामिबिया :
दिवसातील शेवटचा आणि सर्वाधिक चर्चेचा सामना भारत आणि नामिबिया यांच्यात होणार आहे. यजमान भारताने पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली असून आता सलग दुसऱ्या विजयासाठी संघ सज्ज आहे. नामिबियासाठी मात्र ही मोठी कसोटी ठरणार आहे.
एकूणच, गुरुवारी होणारे तिन्ही सामने स्पर्धेतील पुढील समीकरणे ठरवणारे ठरणार आहेत. नेपाळ विजयाचं खातं उघडणार का आणि भारत सलग दुसरा विजय मिळवणार का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.






