ICC ODI World Cup 2027 | क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आगामी ICC Cricket World Cup 2027 स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (International Cricket Council) महत्त्वाचे नियम आणि फॉर्मेट स्पष्ट केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार असून त्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे असेल. त्यात South Africa, Zimbabwe आणि Namibia या देशांचा समावेश आहे. यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांना थेट प्रवेश मिळणार आहे, तर नामिबियाला पात्रता फेरीतून आपली जागा निश्चित करावी लागणार आहे.
14 संघांसाठी पात्रता प्रक्रिया :
या स्पर्धेत एकूण 14 संघांना संधी दिली जाणार आहे. त्यापैकी आठ संघांची निवड आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीच्या आधारे केली जाणार आहे. 31 मार्च 2027 पर्यंत जे संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल आठ स्थानांमध्ये असतील त्यांना थेट वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळेल.
उर्वरित चार संघ पात्रता स्पर्धेतून निवडले जातील. या पात्रता फेरीत एकूण 10 संघ सहभागी होतील आणि त्यातून सर्वोत्तम चार संघांना वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे या स्पर्धेत अनेक नव्या संघांना मोठ्या मंचावर खेळण्याची संधी मिळू शकते.
ICC ODI World Cup 2027 | ‘सुपर सिक्स’ फॉर्मेटमध्ये होणार स्पर्धा :
या वेळी वर्ल्डकपमध्ये ‘सुपर सिक्स’ फॉर्मेट लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला सर्व 14 संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक गटात सात संघ असतील आणि राउंड रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ सहा सामने खेळेल.
गट टप्प्यातील अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’ फेरीत पोहोचतील. या फेरीतील सर्वोत्तम चार संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकाच्या संघाची लढत चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होईल, तर दुसरा आणि तिसरा क्रमांकाचा संघ एकमेकांविरुद्ध खेळतील.
स्पर्धेत लागू असणारे महत्त्वाचे नियम :
या स्पर्धेत काही विशेष नियमही लागू असतील. सामना बरोबरीत सुटल्यास निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. पूर्वीप्रमाणे चौकारांच्या संख्येवर निकाल देण्याची पद्धत वापरली जाणार नाही.
याशिवाय ‘सॉफ्ट सिग्नल’ नियमही लागू असेल. मैदानावरील पंच प्रथम निर्णय देतील आणि त्यानंतर तिसरे पंच विविध अँगलमधून तपासणी करतील. स्पष्ट पुरावा मिळाल्यास निर्णय बदलला जाईल, अन्यथा मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
तसेच सर्व मैदानांवरील सीमारेषा किमान 70 मीटर अंतरावर असणे आवश्यक असेल. हा नियम यापूर्वीच्या वर्ल्डकपमध्येही लागू करण्यात आला होता आणि आगामी स्पर्धेतही तो कायम ठेवला जाणार आहे.






