Home Loan l आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते, विशेषतः शहरांमध्ये. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्जाचा (Home Loan) आधार घ्यावा लागतो. मात्र, २० ते २५ वर्षांच्या या दीर्घ कर्जाचे हप्ते फेडण्यात अनेक वर्षे निघून जातात. जर तुम्हालाही या कर्जाच्या ओझ्यातून लवकर मुक्त व्हायचे असेल आणि २५ वर्षांचे कर्ज केवळ १० वर्षांत फेडायचे असेल, तर काही स्मार्ट टिप्स तुमच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात.
EMI चे गणित आणि अतिरिक्त पेमेंटचा फायदा
गृहकर्जाची परतफेड करताना सुरुवातीला आपण भरत असलेल्या मासिक हप्त्यातील (EMI) मोठा हिस्सा हा व्याजापोटी (Interest) जातो आणि मूळ मुद्दल (Principal Amount) खूप कमी प्रमाणात कमी होते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ८.५% व्याजदराने २५ वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे, ज्याचा मासिक हप्ता (EMI) ४०,००० रुपये आहे. पहिल्या वर्षी तुम्ही हप्त्यांद्वारे एकूण ४.८० लाख रुपये भरता, पण त्यातील केवळ ६०,००० रुपये मुद्दलातून कमी होतात आणि तब्बल ४.२० लाख रुपये फक्त व्याज म्हणून बँकेकडे जातात.
यावर मात करण्यासाठी पहिली महत्त्वाची टीप म्हणजे नियमित हप्त्याव्यतिरिक्त वर्षातून काही अतिरिक्त रक्कम (Additional Payment) भरणे. तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा तुमच्या सोयीनुसार काही रक्कम थेट मुद्दलात जमा करू शकता. उदाहरणार्थ, वर्षातून एकदा ४०,००० रुपयांचा (एका हप्त्याच्या रकमेइतका) अतिरिक्त भरणा केल्यास, ती रक्कम थेट मुद्दल कमी करते, ज्यामुळे व्याजाचा बोजा कमी होतो आणि कर्जाचा कालावधी आपोआप कमी होतो. केवळ ही एक सवय लावल्यास २५ वर्षांचे कर्ज २० वर्षांपर्यंत कमी होऊ शकते.
Home Loan l वार्षिक EMI वाढ आणि एकत्रित धोरण
कर्ज लवकर फेडण्याची दुसरी प्रभावी पद्धत म्हणजे दरवर्षी आपल्या मासिक हप्त्यामध्ये थोडी वाढ करणे. तुमच्या उत्पन्नात जशी वाढ होते, तसा तुम्ही तुमच्या EMI मध्ये दरवर्षी एक निश्चित टक्केवारीने (उदा. ७.५ टक्के) वाढ करू शकता. समजा तुम्ही ४०,००० रुपयांच्या EMI मध्ये दरवर्षी ७.५% वाढ केली, तर तुमचे २५ वर्षांचे कर्ज केवळ १२ वर्षांमध्ये फिटू शकते. यामुळे कर्जाचा कालावधी तर कमी होतोच, पण एकूण भरल्या जाणाऱ्या व्याजाच्या रकमेतही मोठी बचत होते.
सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वरील दोन्ही पद्धती एकत्र वापरणे. म्हणजेच, वर्षातून एक अतिरिक्त हप्ता भरणे आणि त्याचबरोबर दरवर्षी EMI मध्ये ७.५% वाढ करणे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टी केल्या, तर तुमचे २५ वर्षांचे गृहकर्ज केवळ १० वर्षांच्या आत पूर्ण होऊ शकते! यामुळे तुम्ही लवकर कर्जमुक्त होऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि इतर आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकता.








