IMD Heavy Rain Alert | महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट डोकावले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सकाळी मोठा इशारा देत २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील आठवड्यात पावसानंतर काही दिवस विश्रांती मिळाली होती. परंतु आता गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा :
भारतीय हवामान विभागानुसार मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना, परभणी, भंडारा, नांदेड, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD Heavy Rain Alert)
महाराष्ट्रासोबतच छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, गोवा, ओडिशा, आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांतही पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सात राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD Heavy Rain Alert | नाशिक जिल्ह्यात धरणे ओसंडून वाहणार :
नाशिक जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट दाटलेले आहे. जिल्ह्यातील गंगापूर धरण ९८ टक्के भरले असून इतर १२ धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. गंगापूर धरणातून ३०२५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये उद्या व परवा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)
मुसळधार पावसामुळे घाटमाथा व मराठवाडा परिसरात रबी पिकांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. रिमझिम पावसामुळे पिकांना दिलासा मिळेल. मात्र मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






