हार्दिक पंड्याचा मोठा दिलदारपणा! ग्राऊंड स्टाफला वाटले १०-१० लाखांचे चेक; जाणून घ्या यामागचं कारण

On: March 27, 2026 4:25 PM
Hardik Pandya
---Advertisement---

Hardik Pandya | टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा नेहमीच मैदानावरील कामगिरीसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. महागडी जीवनशैली, सोशल मीडियावरील उपस्थिती आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. मात्र यावेळी त्याने केलेल्या एका कृतीमुळे चाहत्यांसह क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्याबद्दल वेगळीच भावना निर्माण झाली आहे.

दिलेला शब्द पाळत दिले लाखोंचे बक्षीस :

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने आयपीएल 2026 (IPL 2026) हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे काम करणाऱ्या ग्राऊंड स्टाफला मोठे बक्षीस दिले. मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 10 ते 11 ग्राऊंड स्टाफ सदस्यांना त्याने प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश दिले. हार्दिकच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आणि त्यामागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

या घटनेनंतर काही जणांनी असा अंदाज व्यक्त केला की आयपीएल सामन्यांसाठी आपल्या संघाला अनुकूल अशी पीच तयार व्हावी यासाठी कदाचित हार्दिकने ही रक्कम दिली असावी. मात्र प्रत्यक्षात यामागचे कारण वेगळेच होते. या कृतीमागे हार्दिकने पूर्वी दिलेला एक शब्द आणि त्या शब्दाची पूर्तता होती. त्यामुळे या निर्णयाला आर्थिक मदतीपेक्षा कृतज्ञतेची भावना अधिक कारणीभूत होती.

Hardik Pandya | टी-20 विश्वचषक तयारीदरम्यान मिळाली होती मदत :

माहितीनुसार, टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेपूर्वी हार्दिक पंड्या वानखेडे स्टेडियमवर सराव करत होता. त्या काळात तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत मैदानावर येऊन सराव करत असे. त्यामुळे ग्राऊंड स्टाफला नियमित वेळेपेक्षा जास्त काळ मैदानावर थांबावे लागायचे. तरीही त्यांनी हार्दिकच्या तयारीत कोणतीही कमी पडू दिली नाही आणि पूर्ण सहकार्य केले.

त्या वेळी हार्दिकने त्यांना आश्वासन दिले होते की योग्य वेळ आल्यावर तो त्यांच्या मेहनतीचे कौतुक नक्की करेल. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या एका सराव सत्रानंतर हार्दिकने हा शब्द खरा करून दाखवला. त्याने सरावात मदत करणाऱ्या सर्व ग्राऊंड स्टाफ सदस्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे चेक देत त्यांचे आभार मानले.

या घटनेनंतर त्या सर्व कर्मचाऱ्यांनी हार्दिकसोबत फोटो काढले आणि हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हार्दिक पंड्याने दिलेला शब्द पाळत केलेल्या या कृतीमुळे चाहत्यांकडून त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. अनेकांनी त्याच्या दिलदार स्वभावाचे उदाहरण म्हणून या घटनेचा उल्लेख केला आहे.

News title : Hardik Pandya Rewards Wankhede Ground Staff

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now