Hardik Pandya| भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एका कायदेशीर वादात सापडला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करताना त्याच्याकडून एक चूक घडली आणि याचमुळे आता तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
हार्दिक पांड्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्याचे वकील वाजिद खान बिडकर (Wajid Khan Bidkar) यांनी हार्दिकविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हार्दिक अडचणीत
विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, एका व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या खांद्यावर तिरंगा (Tricolour) लपेटून मैदानावर नाचताना दिसत आहे. मुख्य आक्षेप असा आहे की, सेलिब्रेशनदरम्यान एका ठिकाणी हार्दिक त्याच्या मैत्रिणीसोबत जमिनीवर बसलेला किंवा पडलेला असतानाही राष्ट्रध्वज त्याच्या अंगावर होता. हे वर्तन भारतीय ध्वज संहितेच्या आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाच्या विरोधात असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
वाजिद खान बिडकर यांनी ही तक्रार पुणे (Pune) येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) दाखल केली आहे. त्यांनी 1971 च्या राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 2 चा हवाला दिला आहे. सुरुवातीला पोलिसांनी ही घटना अहमदाबाद (Ahmedabad) मध्ये घडल्याने तिथे तक्रार करण्यास सांगितले होते, मात्र राष्ट्रध्वज हे संपूर्ण देशाचे प्रतीक असल्याने तक्रार कुठेही दाखल होऊ शकते, या युक्तिवादानंतर पोलिसांनी ही तक्रार स्वीकारली आहे.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याने संपूर्ण स्पर्धेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करत 9 बळी घेतले आणि महत्त्वाच्या फलंदाजीने संघाला सावरले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला आयसीसी (ICC) च्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये स्थान मिळाले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (New Zealand) 96 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा (2007, 2024, 2026) विश्वचषकावर नाव कोरले. घरच्या मैदानावर टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. या ऐतिहासिक यशाच्या आनंदात हार्दिकवरील या कायदेशीर तक्रारीमुळे सध्या उलटसुलट चर्चा सुरू असून, पोलीस आता या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








