Guru Pradosh 2025 | आज 27 मार्च रोजी ‘गुरुप्रदोष व्रत’ पाळले जात असून, या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो, असे शास्त्र सांगते. कर्जमुक्तीसाठी, गुरुकृपा प्राप्तीसाठी आणि शिवकृपेसाठी हे व्रत आज अत्यंत फलदायी मानले जात आहे.
प्रदोष व्रताची वेळ आणि पूजा विधी
प्रदोष व्रत हा प्रत्येक पक्षातील त्रयोदशी तिथीला सायंकाळच्या वेळेस म्हणजेच सूर्यास्ताच्या आधीच्या काळात केला जातो. हा वेळ ‘प्रदोष काल’ किंवा ‘गोधुली बेला’ म्हणून ओळखला जातो. आजच्या गुरुप्रदोष व्रताचा मुहूर्त सायंकाळी 6:46 ते रात्री 9 पर्यंत आहे. या काळात भगवान शिव, देवी पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांची श्रद्धेने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
गुरुप्रदोष व्रताचे विशेष महत्त्व हे आहे की या दिवशी उपवास करून शिवपूजा केल्यास कर्जातून मुक्ती मिळते, सौख्य आणि समाधान प्राप्त होते. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी शिवलिंगावर जल, बेलपत्र, दूध, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून पूजा केली जाते. नैवेद्यात दही-भात अर्पण केल्यावर तो गरजू व्यक्तीला किंवा गायीला दान केला जातो आणि नंतर उपवास सोडला जातो.
पौराणिक महत्त्व आणि व्रताचे शुभफल
पुराणकथेनुसार, हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केल्याचे सांगितले जाते. क्षयरोगाने त्रस्त झाल्यावर चंद्रदेवाने शिवाची भक्ती केली आणि त्यांच्या कृपेने त्यांना वर प्राप्त झाला. या व्रतामुळे भक्ताचे जीवन सुखसमृद्ध होते, कुटुंबात सौहार्द निर्माण होते आणि आध्यात्मिक प्रगती घडते.
असे मानले जाते की, गुरुप्रदोष व्रतामुळे केवळ आर्थिक लाभच नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याचेही संरक्षण मिळते. भौम प्रदोष व्रतामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, तर शनी प्रदोष व्रतामुळे संतानसुख प्राप्त होते. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात आणि विशेषतः उत्तरायण काळात सुरू केल्यास अधिक फलदायी ठरते.
Title : Guru Pradosh 2025 Shiv Puja and vrat






