LPG supply Maharashtra | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. भारतातही एलपीजी (LPG) आणि एलएनजीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा दिसत आहेत. मात्र राज्यात गॅस टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
गॅस पुरवठ्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण :
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोशल मीडियावरून राज्यातील गॅस सिलेंडर परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. इराणविरोधात इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद केल्याने इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतातही एलएनजी आणि एलपीजी उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मात्र राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनेक गैरसमज आणि अफवा पसरत असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारकडून गॅस पुरवठ्याची स्थिती सतत तपासली जात असून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
LPG supply Maharashtra | व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा :
राज्यात घरगुती एलपीजीची रोजची मागणी साधारणपणे ९,००० मेट्रिक टन इतकी असते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून उत्पादन वाढवून ते ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेण्यात आले असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. मार्च महिन्यात मागील सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलचा साठाही पुरेसा असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याने नागरिकांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. (LPG supply Maharashtra)
गॅस पुरवठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा तसेच अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण किंवा तक्रार असल्यास तालुका आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप सुविधा देखील सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.






