पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार! नव्या वर्षात ‘या’ २ महामार्गांच्या कामांना लागणार मुहूर्त

On: January 8, 2026 7:36 PM
Mumbai Goa Highway
---Advertisement---

Pune Highway Project | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2026 वर्ष सुरू होऊन अवघा आठवडाही झाला नसताना पुणे जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. मकर संक्रांतीपूर्वीच ही आनंदाची बातमी मिळाल्याने पुणेकरांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेली वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. शिक्षण, उद्योग आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील दैनंदिन प्रवास अधिकाधिक संथ होत चालला आहे. हीच समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.

हडपसर-यवत सहापदरी उड्डाणपूल :

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून हडपसर-यवत (Hadapsar Yavat Flyover) मार्गावर सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुधारित प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान सुमारे 4.5 किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 5,262 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, पुणे-सोलापूर महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. (Hadapsar Yavat Flyover)

Pune Highway Project | तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग; औद्योगिक वाहतुकीला गती :

याचबरोबर तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548डीच्या कामालाही याच वर्षात सुरुवात होणार आहे. हा मार्ग औद्योगिक वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एकूण 53.2 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी 24.2 किलोमीटरचा भाग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. (Pune Highway Project)

हे दोन्ही प्रकल्प गेल्या वर्षीच मंजूर झाले असून सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही महामार्ग प्रकल्पांचे कंत्राट मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून अंतिम मान्यता मिळताच येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या एकात्मिक विकासाला मोठी चालना मिळणार असून वाहतूक कोंडीवर प्रभावी तोडगा निघणार आहे.

News Title: Good News for Pune: Work on Two Major Highway Projects to Begin in Early 2026

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now