Gold Silver Price | देशांतर्गत बाजारात 19 ऑगस्ट 2026 रोजी सोने आणि चांदीचे दर सलग दुसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाला आहे. अमेरिकन बॉन्ड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरांमुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिट्सकडे लागले आहे.
MCX वर सोने आणि चांदी स्वस्त :
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर 19 ऑगस्टला सोन्याच्या दरात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी होऊन 1,54,166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. दुसरीकडे, चांदीच्या दरात तब्बल 2,349 रुपयांची घट झाली असून ती 2,30,070 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नरमाई दिसली.
जागतिक बाजारातही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीत 0.37 टक्क्यांची घट झाली असून ते 4,403 डॉलर प्रति औंसवर आले आहे. चांदीचा भावही एक टक्क्यापेक्षा अधिक घसरला असून ती 62.895 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. अमेरिकन बॉन्ड यिल्ड वाढल्याने सोन्यातील गुंतवणुकीचा आकर्षण काही प्रमाणात कमी झाले आहे. त्याचवेळी अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेल महागल्याने महागाईबाबत चिंता वाढली असून त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला आहे.
Gold Silver Price | प्रमुख शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव :
देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या समान पातळीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata), चेन्नई (Chennai), पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
चांदीच्या देशांतर्गत किमतीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशभरात चांदीचा दर 245 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 2,45,000 रुपये प्रति किलो असल्याचे नमूद करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातून असलेल्या मागणीमुळे चांदीच्या किमतीला काही प्रमाणात आधार मिळत आहे. मात्र, MCX वरील व्यवहार आणि प्रमुख शहरांतील किरकोळ दरांमध्ये फरक दिसून येतो.






