Gold Silver Price | गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोने-चांदीच्या (Gold Silver Price) किमतीत तर सातत्याने चढ-उतार होत आहेत. काही दिवसांपासून घसरणीच्या दबावाखाली असलेले सोने आणि चांदीचे दर मंगळवारी (10 मार्च) पुन्हा वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा मौल्यवान धातूंमध्ये वाढताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या सराफा बाजारात आता चैतन्याचे वातावरण असून सोन्याने पुन्हा एकदा 1.61 लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण (Iran) सोबतचा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, असे संकेत दिल्याने बाजारातील अनिश्चितता कमी होऊन गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्या-चांदीकडे वळला आहे.
देशांतर्गत वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,61,743 रुपयांवर उघडले. सत्राच्या सुरुवातीलाच या किमती 1,61,719 रुपयांपर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे एका दिवसात सुमारे 1 टक्क्यांची वाढ दिसून आली. दुसरीकडे, चांदीच्या वायदा भावात 4.2 टक्क्यांची मोठी झेप पाहायला मिळाली असून, प्रति किलोसाठी आता 2,78,339 रुपये मोजावे लागत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि अमेरिकन डॉलर निर्देशांकातील कमजोरी यामुळेही सोन्या-चांदीला आधार मिळाला. डॉलर कमकुवत झाला की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात, त्यामुळे त्याचे दर वाढण्याची शक्यता अधिक असते.
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि जागतिक तेलपुरवठ्यावर होणाऱ्या परिणामामुळे काही दिवसांपूर्वी बाजारात मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, तेलाच्या किमतींमध्ये अचानक झालेली घसरण आणि संघर्ष कमी होण्याच्या आशेने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय परिस्थिती आणि डॉलरच्या हालचाली पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.






