Gold Rate Today | एप्रिल महिन्यातच सोने एक लाखाच्या जवळ पोहोचेल असे जे अंदाज बांधले गेले होते, ते आज खरे ठरले आहेत. देशभरात सोन्याच्या किंमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला असून गुंतवणूकदारांसाठी ही वेळ अत्यंत निर्णायक ठरू शकते. (Gold Rate Today)
सोने ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
सोन्याच्या दरात कालपासून प्रचंड वाढ झाली असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 98,500 रुपयांवर पोहोचला आहे. ही किंमत जीएसटीसह असल्याने प्रत्यक्ष बाजारात ग्राहकांना आणखी जास्त किंमत मोजावी लागत आहे. सध्या 22 कॅरेटचे दर 90,300 रुपये तर 14 कॅरेट सोने 56,552 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या किमतीने विकले जात आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेटचे दर 96,670 रुपये आहेत.
सोन्याच्या या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिणाम दिसतो आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) टॅरिफ धोरणामुळे तसेच फेडरल रिझर्व्हसोबत वाढलेल्या वादामुळे डॉलरची किंमत घसरली आहे, ज्याचा थेट फायदा सोनेखरेदीला झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3,430 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
सोन्याच्या दरवाढीनंतर चांदीसुद्धा चमकली
सोन्याच्या या झपाट्याने वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर चांदीही मागे राहिली नाही. एक किलो चांदीचा भाव सध्या 1,01,000 रुपये इतका नोंदवला गेला आहे. यापूर्वी चांदी 1.05 लाखांपर्यंत गेल्यानंतर किंचित घसरण झाली होती, मात्र आता पुन्हा ती तेजीने वर आली आहे.
सराफा बाजारात कर आणि शुल्क यांचा समावेश असतो, त्यामुळे वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय दरांशी थेट तुलना करता येत नाही. तरीसुद्धा मागील आठवड्यात सोन्याने 2,300 रुपयांनी आणि सोमवारीच 700 रुपयांनी उसळी घेतल्यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे.
Title : Gold Rate Today Crosses 1 Lakh






