Gold Price Today | आज २६ मार्च २०२६ रोजी देशभरात रामनवमीचा (Ram Navami) उत्साह असतानाच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत होती, मात्र बुधवारपासून हा कल पूर्णपणे बदलला आहे. अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाला असून, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत.
भारतातील विविध महानगरांमध्ये करांचे प्रमाण आणि स्थानिक शुल्कांमुळे सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे.रामनवमीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी निघालेल्या ग्राहकांसाठी ही दरवाढ महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्राचा विचार करता, मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) सारख्या शहरांमध्येही दरवाढ कायम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,४६,६७० रुपये असून २२ कॅरेटसाठी १,३४,४५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. चेन्नई (Chennai) मध्ये सोन्याचे दर तुलनेने थोडे अधिक असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४८,३७० रुपयांच्या आसपास आहे. या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांमध्ये संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
आज रामनवमीच्या निमित्ताने कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये आंशिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बाजारपेठेतील पहिल्या सत्रात व्यवहार बंद असले तरी सायंकाळी ५ वाजेनंतर व्यवहारांना पुन्हा सुरुवात होईल. बुधवारी बाजार बंद होताना सोन्याच्या फ्युचर्समध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती, मात्र गुरुवारी सकाळी किरकोळ बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. जागतिक स्तरावर सोन्याचे भाव ४,५०० डॉलरच्या (USD) जवळ असून गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
इराणने अमेरिकेच्या शस्त्रसंधी प्रस्तावावर चर्चा करण्यास तयारी दर्शवली असली तरी, थेट वाटाघाटींना नकार दिल्याने अनिश्चितता कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे बाजार तज्ज्ञ पुढील २४ ते ४८ तास अत्यंत संवेदनशील असल्याचे मानत आहेत. चांदीच्या बाबतीतही अशीच स्थिती असून आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ७१.१९ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे, तर भारतात चांदीचा दर प्रति किलो २,५०,००० रुपयांच्या पार गेला आहे.






