Girija Raut | विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबाविरोधातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता त्यांच्या आईने प्रथमच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. त्यांनी विनायक राऊत यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत आपल्या मुलीवर मानसिक छळ झाल्याचा आरोप केला असून, या प्रकरणात अनेक गंभीर दावे केले आहेत.
फ्लॅट, पैशांच्या मागणीचे आरोप फेटाळले :
विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांनी तडजोडीसाठी थ्री बीएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, इलेक्ट्रिक कार, दरमहा पाच लाख रुपये आणि कायमस्वरूपी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला होता. तसेच गिरीजा राऊत यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून, दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये तडजोडीसाठी बैठका झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गिरीजा राऊत यांच्या आईने स्पष्ट केले की, त्यांनी केवळ चर्चेसाठी आणि सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता. “राऊत यांच्या घरीही मुलगी आहे, त्यामुळे आरोप करण्यापूर्वी त्यांनी विचार करायला हवा. आमची मुलगी माहेरी आल्यानंतर गेली तीन वर्षे आम्ही बैठकीसाठी वेळ मागत होतो. मात्र आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला नाही,” असे त्या म्हणाल्या. तसेच गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्याकडून शिवीगाळ आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Girija Raut | उपचारांऐवजी अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारल्याचा दावा :
गिरीजा राऊत यांच्या आईने पुढे आरोप केला की, पैशांसाठी हा वाद निर्माण करण्यात आलेला नाही. “आम्हाला आर्थिक लाभ हवा असता, तर आम्ही तीन वर्षे शांत बसलो नसतो. आम्हाला फक्त आमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, एवढीच अपेक्षा होती,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी विनायक राऊत यांच्यावर अंधश्रद्धेशी संबंधित प्रकरणात सहभागी असल्याचाही आरोप केला आणि या प्रकरणात त्यांच्या अटकेची मागणी केली.
यावेळी त्यांनी वैवाहिक आयुष्याशी संबंधित मुद्द्यावरही भाष्य केले. “शारीरिक संबंधच होत नसतील तर मुलं कशी होणार? आम्ही वैद्यकीय उपचारांचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला देत होतो. मात्र त्याऐवजी अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारण्यात आला,” असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात विनायक राऊत यांनी यापूर्वी सर्व आरोप फेटाळले असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे समोर येत असल्याने हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.






