Gaja Marne | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर पुण्यातील कुप्रसिद्ध मारणे टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. टोळीचा म्होरक्या गजा मारणे उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे गुन्हेगारी जगतात गजा मारणेची एन्ट्री कशी झाली आणि त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Gaja Marne)
गजा मारणेची गुन्हेगारीकडे वाटचाल
गजा मारणे ऊर्फ महाराज हा मूळचा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावातील रहिवासी असून, काही वर्षांपूर्वी त्याचे कुटुंब कोथरूड (Kothrud) येथील शास्त्रीनगर भागात स्थायिक झाले. या काळातच त्याने गुन्हेगारीकडे पाऊल टाकले. पुण्यात मोठे नाव असलेल्या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्ते मिलिंद ढोले (Milind Dhole) यांच्या हत्येनंतर गजा मारणेचं नाव गुन्हेगारी विश्वात गाजू लागलं. त्यानंतर त्याने डेक्कन (Deccan), कोथरूड, सासवड (Saswad), दत्तवाडी (Dattawadi), पौड (Paud) परिसरात आपली दहशत निर्माण केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, 1988 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गजा मारणेवर पहिला गुन्हा दाखल झाला. पुढे 1990 मध्ये त्याच्यावर मारामारीचे दोन आणि समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला गेला. यानंतर त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. पुढील काही वर्ष त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे तो चर्चेत राहिला.
गजा मारणेच्या टोळीच्या वाढत्या कारवाया
1996 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे 2006 मध्ये पुण्यातील सारसबाग (Sarasbaug) भागात त्याने हेल्थक्लबमध्ये वर्चस्वासाठी बबलू कावेडिया (Bablu Kavedia) या व्यक्तीची हत्या केली. या घटनेनंतर त्याची गुन्हेगारी कारकीर्द आणखी वाढली.
न्यायालयाने त्याला काही खटल्यांत निर्दोष मुक्त केलं, मात्र त्याचा एकेकाळचा मित्र निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्याशी त्याचे वर्चस्वाचे संघर्ष सुरू झाले आणि पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झाली. वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर 2012 मध्ये पुणे पोलिसांनी गजा मारणेला पुन्हा एकदा तडीपार केले.
गजा मारणेवर 37 वर्षांत 28 गंभीर गुन्हे
गेल्या 37 वर्षांत गजा मारणेवर डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा (Kamothe), शिरगाव (Shirgaon), हिंजवडी (Hinjewadi), भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 28 गुन्हे दाखल आहेत. यात खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी मागणीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर चार वेळा मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Gaja Marne)
राजकीय नेत्यांसोबत उठबस आणि दहशतवाद
गजा मारणेच्या राजकीय संबंधांबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत. पार्थ पवार (Parth Pawar) आणि खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देखील गजा मारणेच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावल्याचे वृत्त आहे.
Title : Gangster Gaja Marne Arrested Under MCOCA in Pune






