गोळीबाराने अहिल्यानगर हादरलं! गँगवॉरमधून भरचौकात हत्या, एकाचा मृत्यू

On: February 13, 2026 11:36 AM
Ahilyanagar Gang War
---Advertisement---

Ahilyanagar Gang War | अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भीषण गँगवॉर उफाळून आला असून दोन गटांमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोडेगाव येथे घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारात अबरार शेख हा जखमी झाला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा दोन गट आमनेसामने आल्याने परिस्थिती चिघळली. जुन्या वैमनस्यातून हा वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Ahilyanagar Gang War)

जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष :

घोडेगाव येथे दोन गटांमध्ये जुन्या कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या भयंकर घटनेत नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला, तर सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी सूरज फुलमाळी याला पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले आहे. (Ahilyanagar Gang War)

गोळीबारानंतर जखमींना सुरुवातीला अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालय परिसरातही दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे रुग्णालयात पुढील अनर्थ टळला. काही काळासाठी रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Ahilyanagar Gang War | पोलिसांचा वाढीव बंदोबस्त, तपास सुरू :

या प्रकरणात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी जुन्या वादातूनच हा गोळीबार झाल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे. घटनेनंतर नेवासा तालुक्यातील (Newasa) बाजारपेठा तातडीने बंद करण्यात आल्या. (Nevasa Firing News)

सलग दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्याने तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरार प्रत्यक्षात अनुभवल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

News Title: Gang War in Ahilyanagar: One Killed, Another Seriously Injured in Firing at Nevasa

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now