Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे. सकाळी किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारच्या सुमारास तापमान झपाट्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये उकाड्याची तीव्रता वाढली आहे. ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने यंदाचा उन्हाळा कसा असेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. (Maharashtra Weather Update)
मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरडे वातावरण असतानाही आता राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात सातत्याने सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या परिणामामुळे देशभरातील हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येऊ शकतो. येत्या काही तासांत वातावरणात बदल होऊन काही भागांत ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोणत्या भागांत पावसाची शक्यता? :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीदरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पुणे विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते.
हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसला तरी ऐन रब्बी हंगामात पडणाऱ्या पावसाचा पिकांवर परिणाम होऊ शकतो. द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तापमानात वाढ होत असतानाच अचानक पावसाचे आगमन झाल्यास हवामानातील अस्थिरता आणखी वाढू शकते.
Maharashtra Weather Update | तापमानात चढ-उतार; रात्रीचा गारवा कायम :
दरम्यान, उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभावही राज्यावर जाणवत आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे अधिक थंड झाले असून गेल्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील काही भागांत रात्रीचा गारवा वाढला असून सकाळीही थंडीची जाणीव होत आहे. (Maharashtra Weather Update News)
नाशिकमध्ये मागील चार दिवसांपासून कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दिवसाढवळ्या उकाडा जाणवत असताना रात्री मात्र काही प्रमाणात गारवा टिकून आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरक वाढत असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






