Pune Police Warning | अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरातील मानाचे गणपती मार्गस्थ झाले असून हजारो भक्त रस्त्यावरून बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा आदेश जारी करत धार्मिक भावना दुखावण्याचे प्रसंग टाळण्यासाठी फोटो व व्हिडिओ चित्रित आणि प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. (Pune Police Warning)
आदेशाचा कालावधी आणि कायदेशीर आधार :
हा आदेश 4 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत लागू आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल होणार असल्याची पोलिसांनी स्पष्ट सूचना दिली आहे. (Pune Police Warning)
पोलिसांच्या आदेशात म्हटलं आहे की, “नैसर्गिक जलसाठे किंवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे चित्रीकरण व सोशल मीडियावर शेअरिंग केल्याने धार्मिक भावना दुखावू शकतात. यामुळे सार्वजनिक शांततेला धक्का लागू शकतो. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान असे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि प्रसारित करणे प्रतिबंधित आहे.”
Pune Police Warning | विसर्जनाचा आज समारोप :
दरम्यान, पोलिसांनी हा निर्णय सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी आणि गर्दीत कोणतीही अशांतता टाळण्यासाठी घेतल्याचे सांगितले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वातावरण भक्तिमय आणि शांत राहावे, कोणत्याही प्रकारची भडक सामग्री सोशल मीडियावर व्हायरल होऊन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे.
कारण आज देशभरात गणेशोत्सवाचा समारोप होत असून पुण्यात हजारो मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. कौटुंबिक परंपरेनुसार काही जण दीड, पाच, सात दिवसांचा गणपती विसर्जित करतात, तर बहुतेक भक्त आजच बाप्पाला निरोप देतात. विसर्जन हा भक्ती, कृतज्ञता आणि परंपरेचा दिवस असल्याने पोलिसांनी सर्वांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.








