वर्तमानपत्रात गुंडाळलेला वडापाव खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ जीवघेणा आजार; FSSAI ने दिला गंभीर इशारा

On: June 6, 2026 8:09 PM
FSSAI Alert
---Advertisement---

FSSAI Alert | समोसा, भजी, वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून देण्याची पद्धत अनेक ठिकाणी अजूनही पाहायला मिळते. मात्र आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कठोर भूमिका घेतली आहे. अन्नपदार्थ पॅकिंग किंवा सर्व्ह करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केल्यास कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच यामुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

मुंबईतील घटनेनंतर प्रशासनाची कडक भूमिका :

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे नियमबाह्य आहे. अलीकडे मुंबई (Mumbai) येथील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिल्याची बाब समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर एफएसएसएआयच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

या घटनेनंतर सर्व खाद्य व्यावसायिकांसाठी नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते, क्लाऊड किचन, केटरर्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR), हातगाडी चालक तसेच किरकोळ विक्रेत्यांना वर्तमानपत्राचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

FSSAI Alert | वर्तमानपत्रातील शाईमुळे आरोग्याला धोका :

एफएसएसएआयच्या माहितीनुसार, वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये अनेक हानिकारक रासायनिक घटक असतात. यामध्ये रंगद्रव्ये, पिगमेंट्स, बाइंडर्स, शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असू शकतो. गरम किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यास हे रसायन अन्नामध्ये मिसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास पचनसंस्थेशी संबंधित विकार, यकृताचे आजार, मज्जासंस्थेवरील दुष्परिणाम आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स पॅकेजिंग रेग्युलेशन्स 2018 नुसार, अन्नपदार्थ गुंडाळणे, झाकून ठेवणे, अतिरिक्त तेल शोषून घेणे किंवा पॅकिंगसाठी वर्तमानपत्र आणि तत्सम मुद्रित कागद वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय वर्तमानपत्रे छपाईपासून वितरणापर्यंत अनेक हातांमधून जात असल्याने त्यावर धूळ, घाण, जीवाणू आणि इतर रोगकारक घटक जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे फूड पॉइझनिंग आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. एफएसएसएआयने ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करत सुरक्षित आणि फूड-ग्रेड पॅकेजिंगमध्येच अन्नपदार्थ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title: FSSAI Warns Against Newspaper Packaging

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now