Girija Vyas l काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री गिरीजा व्यास (वय ७८) यांची प्रकृती गंभीर असून त्या ९० टक्के होरपळल्या आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथील त्यांच्या राहत्या घरी आरती करताना त्यांच्या दुपट्ट्याला पेटलेल्या दिव्याचा स्पर्श झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
व्हेंटिलेटरवर उपचार सुरू :
गिरीजा व्यास यांना गुजरातमधील अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर त्या घसरून जमिनीवर पडल्या, ज्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली असून ब्रेन हॅमरेजसारखी स्थिती निर्माण झाली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा विचार डॉक्टरांकडून केला जात आहे.
ही घटना ३१ मार्च रोजी घडली. गिरीजा व्यास आपल्या उदयपूरमधील निवासस्थानी घरगुती पूजा करत होत्या. पूजा करताना त्यांनी खाली ठेवलेल्या दिव्याला दुपट्ट्याचा कोपरा लागला आणि त्याला आग लागली. काही क्षणांतच कपड्यांनी पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत त्यांचे शरीर ९० टक्क्यांपर्यंत होरपळले होते.
Girija Vyas l काँग्रेसमधील सक्रिय योगदान :
गिरीजा व्यास या काँग्रेस पक्षातील एक अनुभवी आणि जेष्ठ नेत्या आहेत. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री, तसेच राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही कार्यरत होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या या अपघाताने संपूर्ण काँग्रेस पक्षात तसेच राजस्थानसह देशभरातून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीसाठी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असून शरीरातील भाजलेल्या भागावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. सर्जिकल हस्तक्षेपासाठी प्रकृती स्थिर होण्याची प्रतीक्षा डॉक्टर करत आहेत.






