Indian Airport | देशात सध्या निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान (India-Pakistan) दरम्यानच्या तणावपूर्ण वातावरणामुळे ३२ नागरी विमानतळांवरील उड्डाणे पूर्णपणे थांबविण्यात आली होती. मात्र, परिस्थितीत सुधारणा झाल्याने ही विमानतळे आता पुन्हा नागरी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर हल्ले-
बुधवारी भारताच्या सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला केला. हा हल्ला पहलगाममधील दहशतवादी कारवायीच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आला होता. या कारवाईत २६ हून अधिक संशयित दहशतवाद्यांचा बळी गेला.
या घडामोडीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांशी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये काही अंशी शांततेचे वातावरण तयार झाले. याच पार्श्वभूमीवर भारतातील ३२ नागरी विमानतळांवरील (Indian Airport) बंद सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
उड्डाणांवरील निर्बंध हटले, प्रवाशांना सूचना
या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पाटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपूर, बीकानेर, हलवारा, पठानकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हीरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज, हिंडन आणि शिमला आदी ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे (Indian Airport) पूर्णत: स्थगित करण्यात आली होती.
या निर्णयामुळे देशभरात लाखो प्रवासी अडकले होते आणि अनेक उड्डाणे विलंबाने होत होत्या. १५ मे २०२५ रोजी सकाळी ५:२९ वाजेपर्यंत ही बंदी लागू होती. आता ही सर्व विमानतळे नागरी उड्डाणासाठी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. प्रवाशांनी स्वतःच्या उड्डाणांची माहिती संबंधित एअरलाइन्सकडून तसेच त्यांच्या वेबसाइटवरून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.






