पेरणी कधी करायची? घाई गडबड करू नका! हवामान विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

On: June 5, 2026 5:26 PM
Monsoon Update
---Advertisement---

Monsoon Update | मान्सूनने केरळ (Kerala) राज्यात हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पेरणीसंदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला असून, शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पावसाची प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

100 मिमी पावसानंतरच पेरणीचा सल्ला :

जालना (Jalna) जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्हा कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा सुमारे 6 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 21 हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र हवामान विभागाने यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी यंदाही कापूस आणि सोयाबीन पिकांकडेच वळल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सातारा (Satara) जिल्ह्यातील आणि कराड (Karad) तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली असली तरी पावसाअभावी शेती मशागतीची कामे रखडली आहेत. कराड तालुक्यात 66 हजार 376 हेक्टर क्षेत्र तर सातारा जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 639 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी तयार आहे. उन्हाळी पाऊस न झाल्याने जलस्रोतांवरील ताण वाढला असून भूजल पातळीही घटली आहे. याचा परिणाम ऊस पिकावरही होत असल्याचे सांगितले जात आहे.

Monsoon Update | खत टंचाई आणि बियाण्यांबाबत कृषी विभागाचा इशारा :

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यात युरिया खताच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर खत आणि बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. मात्र यंदा खत आणि बियाण्यांच्या किंमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक खत विक्रेत्यांकडे युरिया उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

काही शेतकऱ्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शासकीय दरापेक्षा अधिक किंमतीत विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. याचवेळी काही विक्रेते पारंपरिक युरियाऐवजी नॅनो युरिया वापरण्याचा सल्ला देत असल्याची माहिती समोर आली आहे. खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कॉसमॉस ऑनलाइन सिस्टीम (Cosmos Online System) लागू करण्यात आली असून, त्याद्वारे नोंदणी झाल्यानंतरच खत विक्री केली जात आहे.

वाशिम (Washim) जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी सुमारे 1 लाख 54 हजार 875 क्विंटल सोयाबीन बियाणे साठवून ठेवले आहे. कृषी विभागाने ही बियाणे वापरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन केले आहे. 100 बियाण्यांची उगवण चाचणी करून त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक बियाणे उगवल्यास ती पेरणीसाठी योग्य मानली जातात. यामुळे शेतकऱ्यांचा बाजारातून नवीन बियाणे खरेदी करण्याचा खर्चही वाचू शकतो.

News Title: Farmers Get Important Sowing Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now