Farmers Big Warning | भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीला १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, मोसमी वारे सध्या अरबी समुद्रात एकाच ठिकाणी रेंगाळले असून त्यांची पुढील वाटचाल पूर्णपणे थबकली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी राजा चिंतेत सापडला असून प्रशासनाने पेरणीबाबत अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात मान्सूनचा खोळंबा आणि नवीन तारीख
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या कोरड्या व गरम वाऱ्यांनी मान्सूनच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. परिणामी, मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकताना दिसत नाहीये. आता हवामान विभागाने दिलेल्या सुधारित इशाऱ्यानुसार, राज्यात २० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा नवीन अंदाज आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून पुढे वाटचाल करण्याची शक्यता असली, तरी सध्या हा केवळ एक अंदाजच असल्याने अनिश्चितता कायम आहे.
बळीराजा चिंतेत; कृषी विभाग आणि मुख्यमंत्र्यांचे पेरणीबाबत आवाहन
पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या तयारीत असलेला शेतकरी वर्ग मोठ्या विवंचनेत आहे. शेतांची नांगरणी पूर्ण झाली असून, घरात बियाणे आणि खते आणून शेतकरी वरुण राजाची चातकासारखी वाट पाहत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाचा कडक इशारा: जोपर्यंत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय होत नाही आणि कृषी विभागाकडून अधिकृतपणे आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या करू नयेत.
जर शेतकऱ्यांनी ऐनवेळी उपलब्ध असलेल्या अल्प ओलाव्यावर पेरणीची घाई केली, तर बियाणे जळून खाक होण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे (Double Sowing) मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते.
एल निनोचे सावट आणि देशांतर्गत मान्सून धोक्यात
यंदा केवळ राज्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा मान्सून धोक्यात आला आहे. प्रशांत महासागरात सध्या एल निनो (El Nino) सक्रिय असून, त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या वाटेत एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक अडथळ्यांमुळे खरिपाचा हंगाम अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे २० जूनच्या पावसाकडे आणि हवामान बदलाच्या पुढील घडामोडींकडे लागले आहेत.
News Title: Farmers Big warning from the Agriculture Department Monsoon Delay June 2026






