BJP | नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश अखेर रद्द करण्यात आला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हा प्रवेश होणार होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra fadanvis) हस्तक्षेपामुळे तो थांबवण्यात आला आहे.
या दोन्ही नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे मारहाणीचे आणि इतर गुन्हे दाखल असल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागळण्याचा धोका होता. त्यामुळे फडणवीसांनी स्पष्ट निर्देश देत हा निर्णय तात्पुरता स्थगित केला. आता जामीन मिळाल्यानंतरच प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे प्रवेश थांबवला; सध्या दोघंही ‘पक्षविरहित’ :
मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचा थेट भाजपमध्ये प्रवेश होणं गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवर आणि पक्षावरच प्रश्न निर्माण करणार होतं.
दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटानेही या दोघांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे सध्या ही दोन्ही नावं ना भाजपमध्ये आहेत, ना शिवसेनेत. त्यामुळे राजकीय अधांतरीपणात अडकलेली स्थिती निर्माण झाली आहे.
BJP | राऊतांचा निशाणा आणि ठाकरे गटाची तातडीची कारवाई :
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोघांच्या भाजप प्रवेशावर टीका करत एक्स पोस्टद्वारे भाजपवर हल्ला चढवला होता. त्यानंतरच गोंधळ वाढला आणि अखेर प्रवेश रद्द झाला.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुनील बागुल (Sunil Banghul) यांची उपनेते पदावरून आणि मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्याजागी आता प्रथमेश गिते यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






