Maharashtra Politics | सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे (Aanasaheb dange) यांनी आज आपल्या दोन मुलांसह थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना याचा थेट राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपा प्रवेश सोहळा भव्यदिव्य :
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज अण्णासाहेब डांगे, त्यांचे सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी भाजपा प्रवेश केला. त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते देखील भाजपमध्ये दाखल झाले.
अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भाजपमध्ये कार्य केले. 1995 मध्ये ते ग्रामीण विकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते फारसे सक्रिय नव्हते. आता पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करत त्यांनी पक्षाला सांगली जिल्ह्यात बळकटी दिली आहे.
Maharashtra Politics | जयंत पाटील यांना धोका? :
अण्णासाहेब डांगे यांचे दोनही मुलगे — चिमण आणि विश्वास डांगे — हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करत होते. मात्र, आता त्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या सांगलीतील पकडीत कमजोरी येऊ शकते, असं मानलं जातंय.
डांगे हे धनगर समाजाचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी आरक्षण, ‘धनगड’ विरुद्ध ‘धनगर’ या वादावरही भूमिका घेतली होती. त्यामुळे, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे धनगर समाजाचा झुकाव पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता आहे.






