Elphinstone Bridge | प्रभादेवी परिसरातील एल्फिन्स्टन पूल अखेर वाहतुकीसाठी बंद होणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर २०२५ पासून या पुलाचे पाडकाम सुरू होणार असून, त्यानंतर हा पूल कायमस्वरूपी बंद राहणार आहे. गणेशोत्सवानंतर हा निर्णय अमलात आणण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये असंतोषाची भावना वाढू शकते.
यापूर्वी पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध झाला होता. परिसरातील काही इमारतींचेही पाडकाम प्रस्तावित असल्याने रहिवाशांनी पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय कारवाई थांबवावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे काम काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी अधिकृत घोषणा केली आहे.
स्थानिकांचा विरोध आणि वाहतूक बदल :
एल्फिन्स्टन पूल हा प्रभादेवी आणि परळ भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पूर्व-पश्चिम दिशेतील प्रवाशांसाठी हा पूल सोयीचा ठरत होता. त्यामुळे पुलाचे पाडकाम करण्याआधी पर्यायी पादचारी पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.
पूल बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रहिवाशांनी घोषणाबाजी केली होती. त्यांनी ‘पूल बंद’चे फलक काढून आंदोलन छेडले होते. आता मात्र गणेशोत्सवानंतर पूल पाडकाम सुरू होणार असल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Elphinstone Bridge)
Elphinstone Bridge | वाहतुकीची नवी आखणी तयार :
वाहतूक विभागाने पुलाच्या बंदीनंतर वाहतुकीवर होणारा ताण लक्षात घेऊन विशेष आखणी केली आहे. परिसरात वाहतूककोंडी निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. लवकरच पत्रकार परिषद घेऊन वाहतुकीबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
मुंबईकरांसाठी हा पूल बंद होणे मोठा धक्का ठरणार आहे. रोजच्या प्रवाशांना आता नवे मार्ग वापरावे लागतील. दरम्यान, पाडकामाच्या काळात वाहतुकीची सुलभता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.






