मतदानाला ६ दिवस उरले अन् ठाकरेंना मोठा हादरा! ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची धाड

On: January 9, 2026 4:18 PM
Shiv Sena
---Advertisement---

Uddhav Thackeray | राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्यावर थेट ईडीने कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे निवडणूक प्रचाराच्या ऐन टप्प्यावर ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. (Maharashtra Municipal Election 2026)

नागपूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे (Uttam Kapse) यांच्या घर आणि कार्यालयावर सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक राजकारणासह राज्यातील वातावरण तापलं असून, निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

नागपूर जिल्ह्यात ईडीची मोठी कारवाई :

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात ईडीच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर आणि दिल्ली येथून आलेल्या ईडीच्या तब्बल 10 पथकांनी पहाटे पाच वाजल्यापासून ही कारवाई सुरू केली. उत्तम कापसे यांच्यासह अनेक व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि मतदानाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना ही कारवाई झाल्याने तिच्या वेळेवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटासाठी ही कारवाई मोठी डोकेदुखी ठरू शकते, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

Uddhav Thackeray | 2021 मधील रेती तस्करी प्रकरणाचा धागा :

ईडीकडून करण्यात येत असलेली ही कारवाई 2021 मधील रेती विक्री आणि तस्करीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणाशी जोडलेली असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्री करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Uttam Kapse ED Raid)

सावनेर परिसरात प्रफुल्ल कापसे, उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते आणि दादू कोलते यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर पाटणसावंगी येथे शरद राय आणि मनोज गायकवाड, तसेच खापा परिसरात अमित राय यांच्या घर आणि कार्यालयांवरही ईडीची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय परिणाम? :

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर ईडीची धाड पडल्याने राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या कारवाईवरून टीका होण्याची चिन्हं दिसत असून, ठाकरे गटाने मात्र ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाल्याचा आरोप करण्याची तयारी सुरू केली आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून पुढील भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ईडीच्या तपासातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि पुढील कारवाई कोणत्या दिशेने जाते, यावरच ठाकरे गटाच्या अडचणी कमी-जास्त होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच उभ्या राहिलेल्या या वादळाचा थेट परिणाम मतदानावर होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title: ED Raid on Thackeray Faction Leader Ahead of Civic Polls, Political Stir in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now