Earthquake Alerts | काल व्हेनेझुएला (Venezuela) मध्ये झालेल्या अत्यंत विनाशकारी भूकंपाने जगभरात खळबळ माजवली आहे. या भीषण आपत्तीत आतापर्यंत १८८ लोकांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली असून, हा आकडा १०,००० ते १,००,००० च्या दरम्यान असण्याची भीती स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे. मात्र, या अत्यंत कठीण परिस्थितीतही गुगलच्या एका आधुनिक तंत्रज्ञानाने लाखो लोकांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे.
भूकंप होण्याच्या काही सेकंद आधी लाखो लोकांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर एक मोठा आपत्कालीन इशारा (Emergency Alert) वाजला, ज्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी काही मोलाचे सेकंद मिळाले. जाणून घेऊया हे तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि आपल्या फोनमध्ये ते कसे सुरू करावे.
गुगलचे ‘भूकंप सूचना तंत्रज्ञान’ (Earthquake Alerts System) कसे काम करते?
भूकंपाचे अचूक भाकीत करणे विज्ञानाला अद्याप शक्य झालेले नाही. मात्र, गुगलने भूकंपाचे भाकीत न करता, पृथ्वीची हालचाल सुरू होताच विजेच्या वेगाने अलर्ट पाठवण्याची प्रणाली विकसित केली आहे. ‘बॉट्स.एआय’चे (Bots.ai) संचालक निखार अरोरा यांनी या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे स्पष्ट केली आहे:
स्मार्टफोन बनले सेन्सर्स: जगभरातील अब्जावधी अँड्रॉइड फोनमध्ये अॅक्सेलेरोमीटर (Accelerometer) नावाचा एक छोटा सेन्सर असतो, जो फोनची हालचाल मोजतो. हे फोन मिळून एक महाकाय सेन्सर नेटवर्क तयार करतात.
लहरींचे गणित (P-Waves आणि S-Waves): भूकंपाच्या वेळी जमिनीतून दोन प्रकारच्या लहरी निघतात. पहिल्या प्राथमिक लहरी (P-Waves), ज्या खूप हलक्या असतात आणि नुकसान करत नाहीत, पण वेगाने प्रवास करतात. त्यानंतर येतात दुय्यम लहरी (S-Waves), ज्या अत्यंत धोकादायक असतात आणि विध्वंस घडवून आणतात.
अल्गोरिदमची कमाल: एखाद्या भागात पी-लहरी पोहोचताच तेथील हजारो अँड्रॉइड फोनमधील सेन्सर्स त्याची नोंद घेऊन डेटा तात्काळ गुगलच्या सर्व्हर्सना पाठवतात. गुगलचे अल्गोरिदम्स सेकंदाच्या काही भागात हा भूकंप असल्याचे ओळखतात आणि धोकादायक एस-लहरी पोहोचण्यापूर्वीच त्या परिसरातील सर्व फोनवर फुल-स्क्रीन सायरन अलर्ट पाठवतात.
५ ते १० सेकंदांचा काय उपयोग?
आपत्कालीन व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते, संकटाच्या वेळी मिळणारे हे ५ ते १० सेकंद जीवन आणि मृत्यू यातील फरक ठरू शकतात:
लोक कमकुवत छतापासून किंवा मोठ्या काचांच्या खिडक्यांपासून दूर होऊ शकतात.
टेबलखाली लपण्यास (Drop, Cover, Hold on) किंवा मोकळ्या जागेत धाव घेण्यास वेळ मिळतो.
चालू असलेले गॅस स्टोव्ह, कारखान्यांमधील यंत्रसामग्री किंवा शस्त्रक्रिया तात्काळ थांबवता येतात, ज्यामुळे लागणाऱ्या आगी आणि इतर मोठे अपघात टाळता येतात.
तुमच्या फोनमध्ये ‘हे’ सेटिंग ताबडतोब चालू (ON) करा:
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खालील स्टेप्स फॉलो करून हे फीचर आत्ताच सुरू करा:
१. सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्ज (Settings) मध्ये जा.
२. तिथे खाली स्क्रोल करून ‘सेफ्टी अँड इमर्जन्सी’ (Safety & Emergency) किंवा ‘लोकेशन’ (Location) या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यात तुम्हाला ‘भूकंप सूचना’ (Earthquake Alerts) हा पर्याय दिसेल.
४. त्यावर क्लिक करून हे फीचर ‘चालू’ (ON) करा.
एन्व्हायरोकेअर फाउंडेशनचे सह-संस्थापक ऋषित पंथ्री यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक करताना सांगितले की, व्हेनेझुएलासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये हे तंत्रज्ञान मानवी जीवनासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते, त्यामुळे अशा डिजिटल सुरक्षा प्रणालींमध्ये गुंतवणूक वाढवणे काळाची गरज आहे.
News Title: Earthquake Alerts Android Venezuela System Activation Guide






