‘तळतळाट द्यायला भाग पाडू नका!’, कोल्हापूरकरांच्या लाडक्या ‘महादेवी’ला परत द्या, डीपीदादांची सरकारकडे मागणी

On: July 31, 2025 1:10 PM
Mahadevi Elephant
---Advertisement---

Mahadevi Elephant | कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात गेली तीन दशके श्रद्धेचा भाग ठरलेली ‘महादेवी’ हत्तीण आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवीला गुजरातमधील वनतारा अभयारण्यात हलवण्यात आलं. मात्र, तिच्यावर झालेला हा निर्णय गावकऱ्यांना आणि लाखो भक्तांना अजिबात मान्य नसून, सोशल मीडियावरून ती परत आणण्याची मागणी जोर धरत आहे. (Mahadevi Elephant Video Viral)

या भावनिक लाटेला आणखी बळ दिलं आहे बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या धनंजय पोवार अर्थात ‘डीपीदादा’ यांच्या इन्स्टाग्राम व्हिडीओने. त्यांनी सरकारकडे थेट भावनिक साद घालत महादेवीला परत कोल्हापुरात आणण्याची विनंती केली आहे.

डीपीदादाचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल, ‘हे प्रेमाचं प्रकरण आहे!’ :

धनंजय पोवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, “हा विरोध आर्थिक कारणांसाठी नाही, ही गोष्ट भावनिक आहे. लाखो लोकांनी महादेवीला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखं मानलं. तिच्याभोवती असलेली भक्ती, श्रद्धा आणि प्रेम यामुळे आज कोल्हापुरात शोककळा पसरली आहे.”

ते पुढे म्हणाले, “माणसांच्या प्रेमात वाढलेली महादेवी हत्तीण वनविभागात हलवली गेली हे पाहून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्या आशीर्वादाने अनेक घरात आनंद नांदला, तिच्या उपस्थितीत अनेक मुलांचे बारसे, लग्न, धार्मिक विधी पार पडले. त्यामुळे तिला घेऊन जाणं म्हणजे केवळ एका हत्तीला हलवणं नाही, तर गावाच्या श्रद्धेचा एक भाग तोडणं आहे.”

Mahadevi Elephant | महादेवी प्रकरण नेमकं काय आहे? :

महादेवी हत्तीण गेली ३३ वर्षे नांदणी मठात आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं आणि महादेवीवर विशेष श्रद्धा होती. 2021 साली गुजरातमधील वनतारा या खाजगी अभयारण्यातून महादेवीसाठी विनंती आली होती. बदल्यात मठाला देणगीही देण्यात येईल असं सांगितलं गेलं, पण मठाने भावनिक नात्यामुळे नकार दिला.

यानंतर PETA या प्राणी हक्क संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाने हाय पॉवर कमिटी नेमून पशुवैद्यकीय अहवाल मागवले. अहवालानुसार हत्तीणीची काळजी आवश्यक असल्याचे सांगत, तिला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले.

Mahadevi Elephant | ग्रामस्थ भावूक, सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक :

महादेवीला निरोप देताना संपूर्ण नांदणी गाव भावूक झाला. मिरवणूक काढण्यात आली, ग्रामस्थ रडले, तिच्या डोळ्यातही अश्रू दिसले. या घटनेमुळे कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक सीमाभागात तीव्र भावना उफाळून आल्या आहेत. #BringBackMahadevi हा हॅशटॅग ट्रेंड करत असून, अनेकांनी जिओवर बहिष्कार टाकत निषेध व्यक्त केला आहे.

News Title: DPdada’s Emotional Plea: Bring Back Mahadevi Elephant to Kolhapur, Don’t Force Public to Curse

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now