ट्रम्पची इराणला धमकी, ऐकलं नाही तर पॉवर प्लान्ट उडवू; 48 तासांचा दिला अल्टिमेटम

On: March 22, 2026 9:59 AM
Iran US War
---Advertisement---

Donald Trump | अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट 48 तासांची मुदत देत इराणला गंभीर इशारा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) विनाअट खुली न केल्यास इराणच्या ऊर्जा केंद्रांवर भयंकर हल्ले केले जातील, अशी स्पष्ट तंबी अमेरिकेने दिली आहे.

वीज प्रकल्पांवर हल्ल्याची थेट धमकी

वॉशिंग्टन आणि तेहरानमधील आधीच बिघडलेले संबंध या ताज्या इशाऱ्यामुळे अधिकच चिघळले आहेत. ट्रम्प प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले आहे की, जर ठरलेल्या वेळेत इराणने माघार घेतली नाही, तर त्यांच्या देशातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती केंद्राला सर्वात आधी टार्गेट केले जाईल. त्यानंतर हे हल्ले इतर ऊर्जा पायाभूत सुविधांपर्यंत वाढवले जातील. कोणत्याही अटींशिवाय हा सागरी मार्ग खुला करणे, हाच एकमेव पर्याय आता इराणसमोर उरला आहे.

संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा ज्या मार्गावर अवलंबून आहे, तो होर्मुझचा पट्टा सध्या तणावाचे मुख्य केंद्र बनला आहे. जागतिक तेल पुरवठ्याची मोठी मदार याच मार्गावर असल्याने येथे होणारा कोणताही अडथळा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर भडकवण्यास कारणीभूत ठरू शकतो. विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील (West Asia) या अस्थिर वातावरणात अमेरिकेने नुकतीच इराणवरील तेल खरेदीची बंदी मागे घेण्याची मोठी राजकीय खेळी केली होती. मात्र, इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या दहशतीमुळे ऊर्जा आणि इंधन वाहून नेणारी अनेक मोठी व्यापारी जहाजे या सामुद्रधुनीत अडकून पडली आहेत.

22 देशांचा संयुक्त निषेध आणि आंतरराष्ट्रीय दबाव

या वाढत्या दादागिरीला चाप लावण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय समुदायानेही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (United Arab Emirates) पुढाकाराखाली एकूण 22 देशांनी एकत्र येत इराणच्या या कारवायांवर सडकून टीका केली आहे. या देशांनी एक अधिकृत संयुक्त पत्रक प्रसिद्ध करून होर्मुझमधील नागरी पायाभूत सुविधा आणि निःशस्त्र व्यापारी नौकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. तसेच, या सागरी मार्गात अडथळे निर्माण करण्याचे इराणचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सुनावले आहे.

या देशांनी स्पष्टपणे नमूद केले की, नौवहन स्वातंत्र्य हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे मूलभूत तत्त्व आहे आणि त्यात अडथळा आणल्यास जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इराणने तात्काळ हल्ले थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Join WhatsApp Group

Join Now