Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील फतेहाबाद येथील एका टोल प्लाझावर दिवाळी बोनसाच्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. कंपनीने दिलेला बोनस अपुरा असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल गेट उघडून दोन तास टोल वसुली थांबवली. या दरम्यान हजारो वाहनांनी टोल न भरता प्रवास केला, ज्यामुळे टोल कंपनीला तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला
फतेहाबाद टोल प्लाझाची जबाबदारी या वर्षी मार्च महिन्यापासून श्री साई अँड दातार कंपनीकडे आहे. या ठिकाणी सध्या २१ कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला, मात्र कर्मचाऱ्यांनी मागील वर्षीप्रमाणे पाच हजार रुपयांचा बोनस देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, गेल्या वेळी पूर्ण बोनस मिळाल्यामुळे यंदाही तसाच बोनस अपेक्षित होता.
मात्र, कंपनीने यावर प्रत्युत्तर देताना सांगितले की, कंत्राट नुकतेच मिळाल्यामुळे पूर्ण वर्षाचा बोनस देणे योग्य ठरणार नाही. हे उत्तर कर्मचाऱ्यांना मान्य न झाल्याने संताप वाढला. शनिवारी रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी टोल गेट उघडले आणि वाहनांना टोल न भरता पुढे जाण्याची मुभा दिली.
Uttar Pradesh | आर्थिक तोटा आणि तणावपूर्ण परिस्थिती
गेट उघडल्यामुळे दोन तास टोल वसुली पूर्णपणे ठप्प झाली. या काळात हजारो वाहनांनी टोल न भरता प्रवास केला आणि कंपनीला सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा फटका बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन दोघेही गोंधळात पडले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मागणी ऐकून घेतली. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले की त्यांच्या कामगिरीचा विचार करून पुढील महिन्यापासून १० टक्के पगारवाढ दिली जाईल. हे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आणि पुन्हा कामावर रुजू झाले.
ही घटना संपल्यानंतर टोल वसुली नेहमीप्रमाणे सुरू झाली. मात्र या घटनेने कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रसंगातून कंपन्यांनी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद देणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट झाले आहे.







