Dhurandhar 2 Movie | बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट अखेर आज भारतासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आणि क्रेझ पाहायला मिळत असून त्याचा परिणाम तिकीट विक्रीवरही दिसून आला आहे. दुपारपर्यंतच या चित्रपटाने भारतात सुमारे 60 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा सुरू आहे.
मात्र चित्रपट प्रदर्शित होताच वादालाही सुरुवात झाली आहे. अधिकृत रिलीजपूर्वी 18 मार्च रोजी या चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे शो अचानक रद्द करावे लागल्याने थिएटर मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
थिएटर मालकांचा संताप का व्यक्त झाला? :
मुंबईतील प्रसिद्ध गेयटी गॅलेक्सी आणि मराठा मंदिर थिएटरचे मालक मनोज देसाई यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, चित्रपटाचे वितरक असलेल्या जिओ स्टुडिओकडून वेळेत KDM न पाठवल्यामुळे थिएटरमध्ये शो दाखवणे शक्य झाले नाही. (Dhurandhar The Revenge controversy)
“आम्हाला KDM मिळालंच नाही, मग चित्रपट कसा दाखवायचा?” असा थेट सवाल मनोज देसाई यांनी उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या थिएटरमध्ये गेयटी, गॅलेक्सी आणि मराठा मंदिर येथे मिळून एकूण सहा शो नियोजित होते. मात्र आवश्यक तांत्रिक फाईल वेळेत न मिळाल्यामुळे हे सर्व शो रद्द करावे लागले.
Dhurandhar 2 Movie | KDM म्हणजे नेमकं काय? :
चित्रपटगृहांमध्ये डिजिटल स्वरूपात चित्रपट दाखवण्यासाठी KDM म्हणजेच ‘की डिलिव्हरी मेसेज’ अत्यंत महत्त्वाची असते. ही एक एन्क्रिप्टेड XML फाईल असते जी प्रोजेक्टर सिस्टममध्ये टाकल्यावरच चित्रपट सुरू होऊ शकतो. निर्मात्यांकडून ही फाईल दिल्याशिवाय थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करता येत नाही. (Dhurandhar 2 Movie controversy)
मनोज देसाई यांच्या मते, केवळ त्यांच्या थिएटरमध्येच नव्हे तर देशभरातील जवळपास 500 चित्रपटगृहांमध्ये ही फाईल वेळेत न पोहोचल्यामुळे प्रिव्ह्यू शो रद्द करावे लागले. नियोजित वेळेपेक्षा जवळपास दोन तास उशिरा KDM पाठवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व घडामोडींमुळे चित्रपट प्रदर्शित होताच वाद निर्माण झाला असला, तरी प्रेक्षकांकडून मात्र चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.






