“धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड नको होता म्हणून…”, ‘त्या’ पोलिसाचा खळबळजनक दावा

On: April 15, 2025 8:12 PM
Dhananjay Munde, Walmik Karad
---Advertisement---

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वाल्मीक कराडच्या (Valmik Karad) फेक एन्काऊंटरसाठी स्वतःला ५० कोटींची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasle) यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुपारीची माहिती दिली होती, मात्र आता त्यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे.

मुंडे यांच्यावर गंभीर आरोप-

माजलगावमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला संपवण्यासाठी आपल्याला सुपारी देण्यात आली होती, असा दावा कासले यांनी यापूर्वी केला होता. त्या वेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता ही ऑफर दिल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता मंगळवारी (16 एप्रिल) जारी केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही ऑफर खुद्द धनंजय मुंडे यांनीच दिली होती.

कासले म्हणाले की, “वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरविषयी मी अनेक चॅनेल्सवर माझं मत मांडलं. त्यानंतर 14 एप्रिल रोजी माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं बोललो असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो. पण हे मुद्दामून केलेलं नव्हतं.”

फडणवीसांचा पाठिंबा, पुरावे दाबल्याचा आरोप

रणजित कासले यांनी पुढे सांगितले की, “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कराड नको होता, कारण तो काही गोष्टी उघड करणार होता. त्यामुळे मुंडे यांना सहआरोपी ठरवलं गेलं असतं. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पूर्ण पाठिंबा आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक महत्त्वाचे पुरावे दाबण्यात आले आहेत.”

त्यामुळेच मुंडे आता या प्रकरणात सहआरोपी ठरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कासले यांनी पोलीस तपासावरही सवाल उपस्थित करत थेट महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिलं आहे.

कासले यांचे पोलिसांना खुले आव्हान-

“मी 20 वर्षांपासून पोलीस दलात आहे, सायबर शाखेत काम केलं आहे. मी रोज दोन गाड्या, दोन मोबाईल, दोन आयएमईआय बदलतो. मी कुणालाही भेटत नाही. मी आता दोन राज्य, दोन आयडेंटिटीमध्ये वावरतो. या सरकारने मला पकडून दाखवावं,” असं कासले म्हणाले.

तसंच, त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याचंही जाहीर केलं. “मी आजच कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल करतो आहे. माझी वकिलांशी चर्चा झाली आहे,” असं त्यांनी व्हिडिओत सांगितलं.

News Title – dhananjay Munde Gave 50 Cr Encounter Deal Ex-Cop

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now