देवेंद्र फडणवीसांची यशस्वी खेळी; राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या गळाला

On: October 17, 2025 7:02 PM
Maharashtra
---Advertisement---

Devendra Fadanvis | आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सोलापूरच्या (Solapur) राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का देत, भाजप-महायुतीने पक्षाच्या चार माजी आमदारांना आपल्या गोटात खेचले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री झालेल्या एका गुप्त बैठकीत या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, येत्या चार ते पाच दिवसांत हे सर्व नेते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मध्यरात्री ‘वर्षा’वर गुप्त बैठक, फडणवीसांची यशस्वी खेळी :

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर या राजकीय भूकंपाची पटकथा लिहिली गेली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी यशस्वी शिष्टाई करत ही मोहीम फत्ते केली. या बैठकीला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), यशवंत माने (Yashwant Mane) आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांचे पुत्र रणजित शिंदे व विक्रम शिंदे उपस्थित होते. बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचारासाठी गेल्याने त्यांच्या मुलांनी या बैठकीत सहभाग घेतला.

या सर्व नेत्यांनी ‘आम्हाला तातडीने भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे,’ असा प्रस्ताव मांडताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्याला तात्काळ मंजुरी दिली. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असताना, आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या पक्षप्रवेशाची बोलणी यशस्वी केली होती.

Devendra Fadanvis  | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का :

सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या रणनीतीचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. “सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे,” असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

जयकुमार गोरे यांनी या पक्षप्रवेशाला दुजोरा देताना सांगितले की, “जिथे पक्षाची ताकद कमी आहे, तिथे ती वाढवण्यासाठी काही पक्षप्रवेश केले जात आहेत. स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही.” या चार माजी आमदारांसोबतच सांगोला आणि पंढरपूरमधील काही प्रमुख पदाधिकारीही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

News title : Devendra Fadnavis’ successful move; 4 former NCP MLAs join BJP

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now