Dahi Handi 2025 | मुंबई व ठाण्यात दहीहंडीचा उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना यंदा मात्र दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरातील महाराष्ट्र नगर येथे दहीहंडीचा दोर बांधताना झालेल्या अपघातात 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाल गोविंदा पथकातील जगमोहन शिवकिरण चौधरी हा दोर बांधण्यासाठी वर चढला असताना तोल गेल्याने खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे. (Dahi Handi 2025)
मुंबईत विविध भागांत 30 गोविंदा जखमी :
दहीहंडी फोडताना मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 30 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 15 जणांवर अद्याप उपचार सुरू असून उर्वरित 15 जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कूपर रुग्णालयात 18 जखमींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 12 जणांवर उपचार सुरू असून 6 जणांना घरी सोडण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात 6 जखमींमध्ये 3 जणांवर उपचार सुरू असून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नायर रुग्णालयात दाखल झालेल्या 6 जखमींपैकी 1 जणावर उपचार सुरू असून उर्वरित 5 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Dahi Handi 2025 | मोफत उपचाराची सुविधा :
मुंबईतील दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना बीएमसीतर्फे मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व महानगरपालिका रुग्णालयांना उत्सवादरम्यान जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात किरकोळ ते गंभीर अशा विविध जखमा झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
उंच लटकणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी मानवी मनोरे रचताना अनेकदा अपघात होतात. यंदा उत्सवाचा आनंद घेत असतानाच झालेल्या या दुर्दैवी घटनेने सणासुदीचा माहोल काहीसा फिका झाला आहे.






