Pune Covid Alert | पुणेकरांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्लँटमध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याचे राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने (NCL) स्पष्ट केलं आहे. यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढल्याचे संकेत मिळत असून, आरोग्य विभागालाही यामुळे अलर्ट व्हावं लागणार आहे.
NCL च्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष :
राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश धर्ने यांनी सांगितलं की, २२ एप्रिल आणि ६ मे रोजी घेण्यात आलेले सांडपाण्याचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. यामधून असं स्पष्ट होतं की, पुण्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. सांडपाण्यात मिळालेल्या विषाणूंची पातळी ही कोविड काळात जशी होती, तशीच आताही आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणं अत्यावश्यक आहे. (Pune Covid Alert)
सांडपाणी प्रक्रियेतून मिळणाऱ्या नमुन्यांच्या तपासणीतून SARS-CoV-2 विषाणूचे जेनेटिक मटेरियल शोधले जाते. हा विषाणू संक्रमित व्यक्तींच्या मल-मूत्रातून बाहेर पडतो. त्यामुळे क्लिनिकल रुग्ण समोर येण्याआधीच संसर्ग वाढत असल्याची माहिती मिळते. हे निरीक्षण लक्षणे नसलेल्या रुग्णांचाही मागोवा घेण्यास उपयोगी ठरत आहे.
Pune Covid Alert | समुदाय स्तरावर धोका वाढण्याची शक्यता :
NCL च्या वेस्टवॉटर सर्व्हिलन्स पद्धतीमुळे प्रशासनाला संपूर्ण शहरात कोरोनाच्या प्रसाराची पूर्वसूचना मिळते. यामुळे नवीन प्रकार, नवसंक्रमण, आणि निदान न झालेल्या रुग्णांची माहिती आधीच उपलब्ध होते. सध्या पुणेकरांसाठी हे धोरण अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.






