Cotton Bud | कानातील मळ म्हणजे अस्वच्छता असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे अनेक जण नियमितपणे कॉटन बड किंवा इतर वस्तूंचा वापर करून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सवय कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कानातील मळ हा नैसर्गिक संरक्षणाचा भाग असल्याने तो विनाकारण काढणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कॉटन बडचा धोका :
कानातील मळाला वैद्यकीय भाषेत सेरुमेन (Cerumen) असे म्हटले जाते. तो कानाच्या नलिकेतील ग्रंथींमधून नैसर्गिकरीत्या तयार होतो आणि कानाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेकजण कानात मळ दिसताच तो घाण समजून कॉटन बड, इअरबड्स किंवा इतर टोकदार वस्तूंच्या मदतीने तो काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा प्रकारे वारंवार कान स्वच्छ करणे योग्य नसल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कानातील मळ धूळ, घाण, जंतू तसेच सूक्ष्म कीटक कानाच्या आतील पडद्यापर्यंत पोहोचू देत नाही. याशिवाय तो कानाच्या आतील त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज येणे किंवा जळजळ होण्याचा धोका कमी होतो. म्हणजेच कानातील मळ हा शरीराने तयार केलेला नैसर्गिक संरक्षणात्मक थर असून तो कान निरोगी ठेवण्यास मदत करतो.
Cotton Bud | कान स्वच्छ करताना घ्या योग्य काळजी:
तज्ज्ञांच्या मते कॉटन बड किंवा इतर टोकदार वस्तूंनी कान साफ करताना मळ बाहेर येण्याऐवजी आणखी आत ढकलला जातो. त्यामुळे कानात मळ साचू शकतो आणि त्यातून कानदुखी, ऐकू कमी येणे, कानात सतत आवाज येणे (Tinnitus), चक्कर येणे तसेच गंभीर परिस्थितीत कानाच्या पडद्याला इजा होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे स्वतःहून कान साफ करण्याऐवजी योग्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
कानातील मळामुळे ऐकण्यास अडथळा येत असेल, कान भरल्यासारखे वाटत असेल, वेदना होत असतील, सतत आवाज येत असेल किंवा डॉक्टरांनी मळ काढण्याचा सल्ला दिला असेल, अशा वेळीच तो काढणे आवश्यक असते. अन्यथा कान स्वतःची स्वच्छता नैसर्गिकरीत्या करत असतो. कानाच्या आतील भागात कॉटन बड, हेअरपिन, चावी किंवा कोणतीही टोकदार वस्तू घालू नये. फक्त बाहेरील भाग मऊ आणि किंचित ओलसर कापडाने स्वच्छ करावा.








