Corona Variant Alert | जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अमेरिकेसह २० हून अधिक देशांत कोविड-१९च्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे SARS-CoV-2 च्या BA.3.2 या जुन्या व्हेरिएंटमुळे काही देशांत संसर्ग वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. (Corona Variant Alert)
अमेरिकेतील आरोग्य संस्थांच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांपासून या व्हेरिएंटची प्रकरणे हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांत पुन्हा कोरोनाच्या संसर्गाची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही पुन्हा मास्क आणि खबरदारीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
BA.3.2 व्हेरिएंट पुन्हा सक्रिय का? :
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, SARS-CoV-2 BA.3.2 हा पूर्णपणे नवीन व्हेरिएंट नाही. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटची काही प्रकरणे आढळली होती. मात्र आता हा व्हेरिएंट अमेरिकेत वेगाने पसरताना दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Corona Variant Alert News)
या व्हेरिएंटमध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये सुमारे ७५ म्युटेशन आढळल्याचे संशोधनात समोर आले आहे. यामुळे हा व्हायरस सतत स्वतःचे स्वरूप बदलत राहतो. त्यामुळे काही वेळा तो शरीराच्या प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे काही देशांत पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
Corona Variant Alert | भारतात परिस्थिती कशी आहे? :
साथींच्या आजारांच्या तज्ज्ञांच्या मते, सध्या भारतात या नव्या व्हेरिएंटची कोणतीही नोंद झालेली नाही. देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यामुळे गंभीर संसर्गाचा धोका तुलनेने कमी असल्याचेही ते सांगतात. (BA.3.2 Variant)
मास्कबाबत सध्या कोणतेही अनिवार्य नियम लागू करण्यात आलेले नाहीत. तरीही गर्दीची ठिकाणे, रुग्णालये किंवा सार्वजनिक वाहतूक यांसारख्या ठिकाणी मास्क वापरणे सुरक्षित ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, लसीकरणामुळे कोरोनाची गंभीर लक्षणे होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी मूलभूत काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.






