Corona Return | गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली असून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. या समोर आलेल्या घटनेनं पुन्हा एकदा कोरोनाचं सावट घोंगावत असल्याचं पहायला मिळतंय.
आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) प्रदीर्घ काळानंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यातील कडप्पा (Kadapa) जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य ४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून बाधितांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. राज्यात यापूर्वी २०२२ मध्ये कोरोनाचा शेवटचा रुग्ण नोंदवला गेला होता.
बाधितांचे लसीकरण पूर्ण; संशयित ओमिक्रॉन व्हेरिएन्ट?
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कडप्पा येथील वायरोलॉजी लॅबमध्ये (Virology Lab) करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीत चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे चारही रुग्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, या सर्वांचे कोरोना काळात पूर्ण लसीकरण (Vaccination) झाले होते आणि त्यापैकी एकाने बुस्टर डोसही (Booster Dose) घेतला होता.
रुग्णांची सद्यस्थिती: ४ पैकी ३ रुग्णांना त्यांच्याच घरात विलगीकरणात (Home Isolation) ठेवण्यात आले आहे. तर चौथ्या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळल्याने त्याला रुग्णालयातील विशेष कोरोना वॉर्डात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पुण्यात तपासणी: हा संसर्ग कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron Variant) उपप्रकारामुळे झाला असावा, असा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अचूक निदानासाठी मृत रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (NIV Pune) पाठवण्यात आले आहेत.
वेल्लोरमध्ये दोघांचा मृत्यू; संपर्क शोध मोहीम सुरू
कोरोनामुळे दगावलेल्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू २८ जून रोजी तामिळनाडूतील ‘सीएमसी वेल्लोर’ (CMC Vellore) येथे उपचारादरम्यान झाला.
१. पहिला रुग्ण (६० वर्षे): या रुग्णाला सुरुवातीला तिरुपतीच्या ‘एसव्हीआयएमएस’ (SVIMS) रुग्णालयात दाखल केले होते, तिथून पुढील उपचारासाठी वेल्लोर येथे हलवण्यात आले. हा रुग्ण मधुमेह आणि किडनीच्या गंभीर आजाराने आधीच ग्रस्त होता.
२. दुसरा रुग्ण (४३ वर्षे): या रुग्णाचा छातीचा सीटी स्कॅन (CT Scan) केल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्याच्या इतर वैद्यकीय नोंदी (Medical History) अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत.
प्रशासकीय उपाययोजना: या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने संबंधित भागात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) मोहीम हाती घेतली आहे. तसेच मृत आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या स्तरातील (First and Second Contacts) लोकांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
News Title: Corona Return Andhra Pradesh Kadapa Two Deaths NIV Pune






