Rakesh Rathod Arrest | उत्तर प्रदेशच्या सीतापूर मतदारसंघाचे काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतर कोर्टानं त्यांच्याविरोधात गैर-जामिनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केलं होतं. आज राठोड आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. (Rakesh Rathod Arrest)
महिलेचा गंभीर आरोप – चार वर्षांपासून अत्याचार
१७ जानेवारी रोजी पीडित महिलेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केला की, खासदार राठोड यांनी तिला विवाहाचे आमिष दाखवून गेली चार वर्षे लैंगिक शोषण केले. तसेच, तिला जिल्हाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केली.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, खासदार झाल्यानंतर राठोड यांनी तिला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्ती संबंध प्रस्थापित केले. विरोध केल्यास, बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे काही दिवस तिने गप्प बसण्याचा निर्णय घेतला. पण अत्याचार सुरूच राहिल्याने अखेर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.
कोर्टाचा आदेश आणि पोलिसांची कारवाई
या प्रकरणात सीजेएम कोर्टानं २७ जानेवारी रोजी राठोड यांच्या विरोधात गैर-जामिनपात्र वॉरंट जारी केलं होतं. पोलिसांनी त्यांना २५ जानेवारी रोजी दुसरी नोटीस पाठवली होती आणि २७ जानेवारीपर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, ते दिलेल्या वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आज त्यांच्या निवासस्थानी धाड टाकून अटक केली. (Rakesh Rathod Arrest)
याआधी उत्तर प्रदेश उच्च न्यायालयानं (High Court) त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी करत तो फेटाळून लावला होता. न्यायमूर्ती राजेश चौहान यांनी राठोड यांना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली.
राकेश राठोड कोण आहेत?
सीतापूर लोकसभा मतदारसंघातून राकेश राठोड यांनी भाजपच्या उमेदवार राजेश वर्मा यांचा पराभव केला होता. त्यांना ५,३१,१३८ मते मिळाली होती, तर भाजप उमेदवाराला ४,४१,४९७ मते मिळाली होती.
राठोड यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली होती. २०१७ मध्ये ते सीतापूर सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, पक्षातील बंडखोरीमुळे त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि २०२४ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. (Rakesh Rathod Arrest)
Title : Congress MP Rakesh Rathod Arrested Serious Allegations of Rape by Woman






