राजकीय वादातून काँग्रेस नेत्याची भरचौकात निर्घृण हत्या; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

On: January 7, 2026 11:45 AM
Hidayat Patel Murder (2)
---Advertisement---

Hidayat Patel Murder | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची राजकीय वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर भरचौकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. (Congress leader killed)

या घटनेमुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नमाजनंतर मशिदीबाहेर हल्ला :

ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात घडली. मंगळवारी दुपारी नमाज अदा करून हिदायत पटेल मशिदीबाहेर येत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मरकज मशिदीच्या परिसरात भररस्त्यावरच हल्लेखोराने चाकूने मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. (Hidayat Patel Murder News)

स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी हिदायत पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने उपचारांचा फारसा उपयोग झाला नाही आणि काही तासांतच त्यांचे निधन झाले.

Hidayat Patel Murder | हल्लेखोर अटकेत, जुना वाद कारणीभूत? :

या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उबेद पटेल नावाच्या संशयिताला अटक केली आहे. उबेद पटेल हा २०१९ मध्ये हत्या झालेल्या भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या राजकीय वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोहाळा गावात भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची राजकीय वादातून हत्या झाली होती. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर आरोप दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

हिदायत पटेल कोण होते? :

हिदायत पटेल (Hidayat Patel) हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख मुस्लिम नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी तब्बल आठ वर्षे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले होते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून उमेदवार होते.

राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांनी २५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. याशिवाय अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्याचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. (Akola political murder)

दरम्यान, या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. राजकीय नेत्यांकडून हत्येचा तीव्र निषेध केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Congress Leader Hidayat Patel Brutally Murdered in Akola After Political Dispute, Sparks Statewide Shock

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now