Abhijeet Dipke | कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांवरून त्यांचा पोलिसांशी वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण हटवावे, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी :
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. सध्या सीजेपीच्या आगामी रणनीतीसंदर्भात त्यांच्या बैठका सुरू असून विविध राजकीय नेते आणि सामान्य नागरिक त्यांची भेट घेण्यासाठी घरी येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी नागरिक आणि कार्यकर्त्यांशी पोलिसांकडून उद्धटपणे वर्तन केले जात असल्याचा आरोप दीपके यांनी केला होता.
या घटनेनंतर आता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे दीपके यांचे पोलीस संरक्षण तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. यासोबतच अभिजीत दीपके यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
Abhijeet Dipke | नेमका वाद कशामुळे झाला? :
दीपके यांच्या घरी मागील काही दिवसांपासून त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, पोलीस नागरिकांना आपली भेट घेण्यापासून रोखत असल्याचा आरोप दीपके यांनी केला. पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत त्यांनी एका अधिकाऱ्याला जाब विचारला. “मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे पोलिसांनी ठरवायचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती.
यावेळी दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याची ओळख आणि पदाबाबतही प्रश्न उपस्थित केले. “तुम्ही कोणत्या विभागातून आला आहात? कोणत्या पोलीस ठाण्यातील आहात? तुमचे पद काय?” अशी विचारणा त्यांनी केली होती. नागरिकांना आपल्याला भेटण्यापासून पोलिसांनी रोखू नये, असे सांगताना त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला आपल्या निवासस्थानाच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचेही या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.






