Commercial Gas Supply | पश्चिम आशियातील तणावामुळे देशभरात इंधन टंचाई जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांची दुकाने बंद करण्याची वेळ आली. अशातच आता केंद्र सरकारने व्यावसायिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि कॅन्टीनसाठी व्यावसायिक LPG वाटपात वाढ करण्यात आली आहे.
रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा
हॉटेल, ढाबे आणि कॅन्टीनसारख्या व्यवसायांसाठी व्यावसायिक गॅसच्या वाटपात थेट वीस टक्क्यांची वाढ करून ते आता 50 टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. देशांतर्गत उत्पादनात सुधारणा होत असल्याने परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर सुरुवातीला मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे घरगुती वापराला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रातील गॅस पुरवठा कमी करण्यात आला होता. नंतर परिस्थिती सुधारताच 20 टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि अतिरिक्त 10 टक्के वाटप PNG प्रकल्पांना गती देण्याच्या अटीवर देण्यात आले.
सरकारची दिलासादायक पावले
शनिवारी सरकारने आणखी 20 टक्के अतिरिक्त वाटप जाहीर करत महत्त्वाच्या क्षेत्रांना दिलासा दिला. यामध्ये स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलोच्या सिलिंडरच्या स्वरूपात मदत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलियम विभागाने राज्यांना स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त वाटप मिळवण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांनी तेल कंपन्यांकडे नोंदणी करून पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शनसाठी अर्ज करणे आवश्यक असेल.
पुरवठा स्थिर, घाबरून खरेदी टाळा
सरकारच्या माहितीनुसार घरगुती LPG पुरवठा सध्या पूर्णपणे स्थिर आहे आणि कुठेही तुटवडा नोंदवला गेलेला नाही. नागरिकांनी घाबरून बुकिंग न करता घरपोच सेवांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच, PNG आणि CNG सारख्या प्राधान्य क्षेत्रांना नियमित पुरवठा सुरू आहे, तर औद्योगिक ग्राहकांना सुमारे 80 टक्के गॅस पुरवठा दिला जात आहे. देशातील सर्व रिफायनरी पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.






