Comedian Pranit More | गेल्या काही दिवसांपासून आपल्या कार्यक्रमातील वादग्रस्त विधानांमुळे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सतत होणाऱ्या अश्लील टिपण्ण्यांमुळे आता तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या शोमधील अश्लील विधानांचे व्हिडीओ व्हायरल होताच त्याने माफी मागितली आहे.
प्रणित मोरेच्या शोमधील काही आक्षेपार्ह क्लिप्स समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या, ज्यामध्ये महिलांविषयी आणि वैद्यकीय अभ्यासासाठी असलेल्या मृतदेहांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करण्यात आली होती. चौफेर होणाऱ्या टीकेनंतर आणि वाढता दबाव पाहून त्याने एक व्हिडिओ जारी करत प्रेक्षकांकडे आणखी एक संधी देण्याची याचना केली आहे.
संवेदनशील मुद्द्यांवरून झालेल्या तीव्र ट्रोलिंगनंतर कॉमेडियनचा माफीनामा
प्रणित मोरे याच्या स्टँडअप कॉमेडी शो (Standup Comedy Show) मधील क्लिप्स समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला होता. विशेषतः केईएम रुग्णालयातील एका विद्यार्थिनीसोबत मृतदेहांच्या खाजगी अवयवांवरून केलेला विनोद आणि महिलांविषयीच्या टिप्पण्यांमुळे हा वाद विकोपाला गेला होता. या प्रकारामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांनीही त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती.
View this post on Instagram
या वाढत्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी प्रणित मोरे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवरून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्याने मान्य केले आहे की, त्याच्याकडून आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून जाहीर व्यासपीठावर चूक झाली असून लोकांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. “माझ्याकडून चूक झाली आहे, मला सुधारण्याची एक संधी द्या”, असे म्हणत त्याने प्रेक्षकांसमोर जाहीरपणे माफी मागितली आहे. या माफीनाम्यानंतर आता नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title: Comedian Pranit More Apologizes For Show Controversy






