Uddhav Thackeray | शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बंडानंतर आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) पदाधिकारी राजकुमार हिवरकर (Rajkumar Hivarkar) यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटातील आमदारांबाबत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खासदारांनंतर आता आमदारांबाबतही दावा :
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबई (Mumbai) येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीनंतर ठाकरे गटातील खासदारांची संख्या नऊवरून केवळ तीनवर आली, तर शिंदे गटाचे खासदार सातवरून थेट तेरा झाले. त्यामुळे संसदीय पातळीवर शिंदे गटाचे संख्याबळ लक्षणीय वाढले आहे.
याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर (Sachin Ahir) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. हा निर्णय ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात असतानाच आता नवीन राजकीय दावे समोर येऊ लागले आहेत.
Uddhav Thackeray | 26 आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा :
सोलापूर (Solapur) येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी मोठा दावा केला. सचिन अहीर यांचा पक्षप्रवेश हा केवळ पहिला टप्पा असून, आगामी काळात तब्बल 26 आमदार शिंदे गटात प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजघटकांतील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत असून, पुढील काळात आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वीही शिंदे गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी अशाच प्रकारचे दावे केले होते. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी “ऑपरेशन टायगर 3.0” सुरू असल्याचे म्हटले होते. तसेच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही ठाकरे गटातील अनेक आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या घडामोडींच्या चर्चांना वेग आला असून, पुढील काळात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






