CIDCO Housing Scheme | स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी सिडको (CIDCO) ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील प्रमुख आणि विकसित भागांमधील सदनिकांची विक्री आता लॉटरीशिवाय करण्यात येणार असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Served) तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांना थेट पसंतीचे घर निवडण्याची संधी मिळणार आहे.
खारघर आणि नेरूळमध्ये 184 घरांची विक्री :
‘प्रारंभ नव्या घराचा, समृद्ध जीवनशैलीचा’ या संकल्पनेअंतर्गत सिडकोने खारघर (Kharghar) आणि नेरूळ (Nerul) येथील विविध गृहसंकुलांतील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये खारघरमधील स्वप्नपूर्ती (Swapnapurti) आणि सेलिब्रेशन केएच-3 (Celebration KH-3) तसेच नेरूळमधील एनआरआय (NRI) गृहसंकुलांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) या सर्व वर्गांसाठी एकूण 184 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वप्नपूर्ती प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 122 वन बीएचके (1 BHK) घरे उपलब्ध आहेत. या गटासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली असून 75 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सेलिब्रेशन केएच-3 प्रकल्पात मध्यम उत्पन्न गटासाठी 47 एक बीएचके सदनिका उपलब्ध आहेत. या गटासाठी 9 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न निकष ठेवण्यात आला असून 5 लाख रुपयांची अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
CIDCO Housing Scheme | अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम :
नेरूळमधील एनआरआय गृहसंकुलात उच्च उत्पन्न गटासाठी अकरा 2 बीएचके (2 BHK) आणि 4 तीन बीएचके (3 BHK) सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गटासाठी वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून 10 लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. अर्जदारांना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच 236 रुपये (जीएसटीसह) नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीनुसार सदनिका निवडण्याची संधी दिली जाईल.
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 12 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झाली आहे. तर घरांच्या बुकिंगची प्रक्रिया 27 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि मेट्रोची उत्तम जोडणी उपलब्ध असून परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदारांना EWS, MIG किंवा HIG गटातील घरे बुक करता येतील. मात्र मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांना EWS गटातील सदनिका घेता येणार नाहीत, तर उच्च उत्पन्न गटातील अर्जदार केवळ HIG गटातील घरांसाठीच पात्र असतील.






